Home पंढरपूर अवैध वाळू उपसा करणार्‍या पिकअपने पती-पत्नी ला उडवले ; पत्नीचा जागीच मृत्यू.

अवैध वाळू उपसा करणार्‍या पिकअपने पती-पत्नी ला उडवले ; पत्नीचा जागीच मृत्यू.

2148
0

पंढरपूर

पंढरपूर :- अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या पिकअपने दुचाकीवरुन जाणाऱ्या पती-पत्नीला उडवले. अंबाबाई पटांगणातील नवीन पुलावर झालेल्या अपघातांमध्ये पत्नीचा जागीच मृत्यू झालाय तर पती गंभीर असल्याने त्यांना सोलापूरला खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
पंढरपूर शहर आणि ग्रामीण भागात भीमा नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत आहे. 24 तास हा अवैध वाळूउपसा होत असून यामध्ये बिगर नंबर प्लेट च्या गाड्यांचा सर्रास वापर केला जातो. आज सकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान गोविंदपुरा येथे राहणारे बारले पती-पत्नी आपल्या दुचाकीवरून 65 एकरा कडे जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या पिकअपने जोरात धडक दिली. यामध्ये जवळपास पन्नास फुटापर्यंत या पीकअपने दुचाकीला फरफटत नेले. यामध्ये पत्नी जागीच ठार झाली आहे.
नवीन पुलावरून 65 एकर एकराकडे अंबाबाई पटांगण, गोविंदपुरा, हरिदास वेस, व्यास नारायण झोपडपट्टी शहरातील अनेक नागरिक 65 एकरात मॉर्निंग वॉकला जातात. पंढरपूर सोलापूरला जोडणारा हा महत्त्वाचा पूल असल्याने या पुलावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. आणि याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जातो. प्रशासनाला वारंवार निवेदन आंदोलन करून देखील आजही वाळू उपसा थांबलेला नाही. नुकतेच पंढरपूर दौऱ्यावर आलेले गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी या वाळू तस्करांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. तरीसुद्धा हा अवैध उपसा सुरू आहे. यावेळी गृहराज्यमंत्र्यांनी यामध्ये पोलिसांचा सहभाग असेल तर त्यांच्यावर देखील कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. मात्र कुठलीही कारवाई झाली नसल्याने आज पुन्हा वाळू उपशाने एकाचा बळी घेतलाय.
या वाळू तस्करांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी नगरसेवक विक्रम शिरसाट यांनी केली आहे. तर वाळू तस्करांचे कॉल डिटेल्स तपासून सर्वांवर कारवाई करण्याची मागणी कोळी महासंघाचे अध्यक्ष अरुण भाऊ कोळी यांनी केली आहे.