Home सोलापूर आमदार तानाजी सावंतांचे समर्थन आले अंगलट. लक्ष्मीकांत ठोंगे पाटलांची हकालपट्टी.

आमदार तानाजी सावंतांचे समर्थन आले अंगलट. लक्ष्मीकांत ठोंगे पाटलांची हकालपट्टी.

4203
0

पंढरपूर:- लक्ष्मीकांत ठोंगे पाटील यांच्यावर पक्षविरोधी कारवाई केल्याचा आरोप करण्यात आला आहे. लक्ष्मीकांत पाटील हे आमदार तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळात समाविष्ट करून घ्यावे यासाठी सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात शिवसेनेवर दबाव आणण्यासाठी शिवसैनिकांची बैठक बोलावली होती. त्यांच्या या दबाब तंत्रामुळे अखेर त्यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. दरम्यान शिवसेनेचे सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील पदाधिकारी आज शिवसेना प्रमुख मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची भेट घेणार आहेत. आमदार तानाजी सावंत यांची सेनेतून हकालपट्टी करण्याची ते मागणी करणार असल्याचे समजते.
राज्यात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या महाविकासआघाडीचा पॅटर्न उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अमलात आणला जाणार होता. मात्र तानाजी सावंत यांनी महाविकास आघाडीला धक्का देत भाजपला साथ दिली होती. त्यामुळे आमदार तानाजी सावंत यांच्या गटातील सात सदस्यांनी भाजपा पुरस्कृत उमेदवाराला पाठिंबा दिला होता. भाजप-शिवसेनेच्या युतीमुळे उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अस्मिता कांबळे तर उपाध्यक्षपदी तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांची निवड झाली.

त्यासोबतच मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला सुद्धा सावंत यांनी दांडी मारली होती, आमदार सावंत यांच्या या कृतीमुळे शिवसैनिकांमध्ये कमालीची नाराजी पसरली होती. त्यामुळे सोलापुरात तानाजी सावंत यांना खेकड्याची उपमा देत “हा खेकडा शिवसेना पोखरत आहे, वेळीच नांग्या मोडा,” अशी विनंती मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना शिवसैनिकांनी केली आहे. हा बॅनर सोलापुरात चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.
आमदार तानाजी सावंत यांच्यावर विधानसभा निवडणूकीत सोलापूर जिल्ह्याचे उमेदवार निवडीची जबाबदारी होती. यावरून सावंतानी आपल्या पदाचा गैरफायदा घेत अनेक आयारामांना तिकिट दिले. त्यामुळे निवडून येणाऱ्या जागांवर सेनेला पराभव पत्करावा लागला होता. तसेच मंत्रीपद न मिळाल्याने सावंतांनी थेट पक्षप्रमुखांनाच आव्हान दिल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान सोलापूर सह पंढरपूर मध्ये देखिल सावंताच्या समर्थनार्थ बैठका घेण्यात आल्या. यासाठी ठोंगे पाटलांनी पुढाकार घेतला होता. आता ठोंगे पाटलांची हकालपट्टी केल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान मातोश्रीच्या निर्णयाकडे सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सावंत समर्थकांचे दोर कापण्याचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.