Home सोलापूर एक डिसेंबर पासून पथकर नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही.

एक डिसेंबर पासून पथकर नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही.

305
0

महामार्गावरुन प्रवास…तर FASTag हवाच…

सोलापूर:- राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करताना आता चारचाकी वाहनांना FASTag बसवणे अनिवार्य आहे. कारण पथकर नाक्यावर एक डिसेंबर २०१९ पासून रोख रक्कमेच्या माध्यमातून पथकर स्वीकारला जाणार नाही. तरी चारचाकी आणि त्यापुढील वाहनधारकांनी FASTag बसवून घ्यावे, असे आवाहन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी केले आहे.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सन २०१६ पासून FASTag electronic toll collection system सुरु केली आहे. त्यानुसार ७ मे २०१८ रोजी केंद्र सरकारने याबाबतचे राजपत्रही जाहीर केले आहे. त्यानुसार ही कार्यवाही करण्यात येत आहे, असे श्री. कदम यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

श्री. कदम यांनी नमूद केले आहे की, FASTag यंत्रणा सर्व पथकर नाक्यावर उपलब्ध आहे. त्याचबरोबर भारतीय स्टेट बँक, एचडीएफसी, आयसीआयसीआय, ॲक्सिस, आयडीएफसी आदी बँक शाखेत विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्याचबरोबर FASTag online purchase पोर्टल वरही उपलब्ध आहे. गुगल प्ले स्टोअरवर My FASTag ॲप्लिकेशन उपलब्ध आहे.

FASTag काय आहे ?

FASTag एक पातळ ईलेक्ट्रॉनिक चिप आहे. ही चिप वाहनांच्या दर्शनी भागात चिकटविण्यात यावी.ही चिप निश्चित केलेल्या रक्कमेला खरेदी करता येईल. ही चिप ग्राहकांच्या बैंक अकाऊंटला जोडता येते.

FASTag कसे काम करते?

FASTag चिकटवलेले वाहन पथकर नाक्यावरुन पुढे जाईल त्यावेळेस निश्चित केलेला पथकर वाहनधारकाच्या FASTag अकाऊंटमधून वजा होईल. FASTag ओळखण्यासाठी पथकर नाक्यावर विशेष उपकरणे बसविण्यात आली आहेत. त्याव्दारे FASTag चिप ओळखली जाईल. चिप स्कॅन झाल्यावर पथकर नाक्यावरील बूम आपोआप उघडले जाईल आणि वाहनास थांबावे न लागता पुढे जाता येईल.

FASTag वापरण्याचे फायदे

FASTag च्या वापरामुळे वेळ आणि इंधनाची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. याबाबत ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कोलकता यांनी सविस्तर अभ्यास केला आहे. त्यानुसार दरवर्षी देशभरात ८७ हजार कोटी रुपयांची बचत होईल. त्याचबरोबर पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागणार आहे, असेही श्री. संजय कदम यांनी स्पष्ट केले.