पंढरपूर :- जुलै महिन्यात चंद्रभागा नदीला आलेल्या महापुरामुळे नदीकाठच्या वसाहतीमध्ये पाणी शिरले होते . शेकडो कुटुंबांचे स्थलांतर यावेळी करण्यात आले होते. चार महिने उलटले तरी या पूरग्रस्तांना शासकीय अनुदान, नुकसान भरपाई मिळाली नाही. नुकसान भरपाई तात्काळ न मिळाल्यास ११ नोव्हेंबर पासून आमरण उपोषणाचा इशारा पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसाठ यांनी दिला आहे.
जुलै महिन्यात शहरातील अंबाबाई पटांगण, लखुबाई वसाहत , व्यासनारायण झोपडपट्टी, जुना सोलापूर नाका या भागात पुराचे पाणी शिरले होते. आठ दिवस या भागातील कुटुंबं स्थलांतरित झाले होते . जवळपास ४०% पूरग्रस्त हे शासकीय मदतीपासून वंचित आहेत. यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी आमरण उपोषणाचा इशारा माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसाठ यांनी दिला आहे.
पंढरा दिवसापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणूकीत अनेकांनी या पूरग्रस्तांना मदत केल्याचा कांगावा केला होता. मात्र शिरसाठ यांच्या उपोषणाच्या इशार्याने आजही ४०% पूरग्रस्त शासकीय मदतीपासून वंचित असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे .