Home पंढरपूर देवकार्याच्या बोकडाच्या जेवणाला न आल्याच्या कारणावरून पंढरपूर तालुक्यात युवकाची हत्या.

देवकार्याच्या बोकडाच्या जेवणाला न आल्याच्या कारणावरून पंढरपूर तालुक्यात युवकाची हत्या.

4067
0

पंढरपूर :- घरी केलेल्या देवकार्याच्या बोकडाच्या जेवणास न आल्याचा मनात राग धरून युवकाची हत्या केल्याची घटना पंढरपूर तालुक्यातील पळशी गावात घडली आहे. याप्रकरणी पंढरपूर ग्रामीण पोलिसात पाच जणांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल झालाय. सोमनाथ राजाराम मोरे असे मयत युवकाचे नाव आहे.
मयताचा चुलत भाऊ दत्तात्रय माणिक मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, यातील मुख्य आरोपी दिगंबर उत्तम वाघमारे हा ग्रामपंचायत सदस्य आहे. तसेच एका पक्षाचा पुढारी असल्याने त्याचा गावात दबदबा आहे.
मयताची वस्ती आणि आरोपींची वस्ती शेजारीच आहे. ९ फेब्रुवारी रोजी आरोपी दिगंबर वाघमारेच्या घरी देवकार्य होते. त्यानिमित्ताने त्याने बोकड कापले होते. या मांसाहारी जेवणाचे निमंत्रण वाघमारेने मोरे कुटुंबाला दिले होते. मात्र ९ फेब्रुवारी रोजी रविवार असल्याने मोरे कुटुंबाच्या घरी देखिल मांसाहारी जेवणाचा बेत असल्याने फिर्यादी आणि मयत हे वाघमारेच्या घरी गेले नाहीत.
आपल्या घरी जेवायला न आल्याचा राग मनात धरून मुख्य आरोपी दिगंबर वाघमारेने १० फेब्रुवारी रोजी रात्री ८:३० च्या मोरे कुटुंबाला शिवीगाळ करण्यास सुरवात केली. यावेळी वसंत मोरे, रामचंद्र मोरे, मच्छिंद्र मोरे, भारत मोरे, महेश राजाराम मोरे हे वाघमारेला समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र वाघमारे कुटुंबाची शिवीगाळ सुरुच होती. दरम्यान समजावून सांगणाऱ्या फिर्यादी दत्तात्रय मोरे आणि वंसत मोरे यांना दिगंबर वाघमारेने गालावर चापट मारली. घरासमोर भांडण सुरु असल्याचा आवाज आल्याने मयत सोमनाथ मोरे हा धावत घराबाहेर आला. तो आला तसे दिगंबर उत्तम वाघमारे, नारायण उत्तम वाघमारे, हरिदास उत्तम वाघमारे हे तीन सख्खे भाउ आणि श्रीधर माणिक वाघमारे, सचिन सदाशिव वाघमारे (सर्व रा. वाघमारे वस्ती, पळशी ता. पंढरपूर) यांनी सोमनाथचा गळा दाबून मारहाण करण्यास सुरवात केली. सोमनाथला आरोपींनी भिंतीवर आपटले. लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. सोमनाथला आरोपी मारहाण करीत असल्याचे पाहुण घरातील महिलांनी सोमनाथला सोडविण्याचा प्रयत्न केला असता मुजोर आरोपींनी महिलांना देखिल मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
ही हत्या जेवायला न आल्यामुळे आहे की? खरे कारण वेगळे आहे याचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
दत्तात्रय मोरेंच्या फिर्यादीवरुन आरोपींवर भादवि ३०२,१४३,१४७,१४९,३२३,५०४,५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील मुख्य आरोपी दिगंबर वाघमारेला अटक केली असून पुढील तपास पो.नि. भस्मे करीत आहेत.