पंढरपूर :- जगात हाहाकार माजवलेल्या कोरोना महामारीने सोलापूरच्या ग्रामीण भागात प्रवेश करण्यात सुरवात केलीय. सांगोल्यानंतर मोहोळच्या महिलेला कोरोनाची बाधा झालीय. मात्र या महिलेने पंढरपूरच्या एका नामांकित खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले होते. त्यामुळे हे हॉस्पिटल सील करण्यात आले आहे. या हॉस्पिटलमधील महिलेच्या संपर्कात आलेल्या तब्बल ४७ लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
याबाबतीत सविस्तर वृत्त असे की, मोहोळच्या पेनुर-पाटकुलची महिला पंढरपूरमध्ये बाळांतपणासाठी २१ एप्रिल रोजी ॲडमिट झाली होती. सदरच्या महिलेने जुळ्यांना जन्म दिला. यामध्ये एका अर्भकाचा मृत्यू झाला तर एक वाचले. त्याला पुन्हा पंढरपूरच्याच एका नामांकित बाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्या महिलेला कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने सोलापूरला पाठविण्यात आले होते. यामध्ये तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला.
त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. पेनूर-पाटकुलचा तीन ते सात किलोमीटरचा परिसर सील करण्यात आला आहे. तर मोहोळ मधिल १५ लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
त्याच बरोबर पंढरपूरमधील ४७ लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. यामध्ये १० डॉक्टरांचा समावेश आहे. १० पैकी ६ डॉक्टर्स हे त्या हॉस्पिटलमधील आहेत तर ४ बाहेरचे आहेत. तसेच नर्सेस, रुग्णाच्या नातेवाईकांच्या संपर्कात आलेले हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना देखिल क्वारंटाईन करण्यात आले आहे. यामध्ये हायरिस्क संपर्कातील देखिल व्यक्ती आहेत. त्या महिलेच्या नवजात बालकास देखिल सोलापूरला पाठविण्यात आले आहे.
रविवारी रात्री कोरोना बाधित रुग्णाने पंढरपूरमध्ये उपचार घेतल्याची बातमी वाऱ्यासारखी पंढरपूरमध्ये पसरली. त्यानंतर पंढरपूरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांना कोरोनाचे गांभीर्य आता लक्षात आले असून रात्रीतुनच ठिकठिकाणी रस्ते बंद करण्यात आले आहेत.