Home पंढरपूर पंढरपूर तालुक्यात अतिवृष्टी आणि महापूरामुळे 65 हजार हेक्टर क्षेत्रावरील पीकांचे नुकसान.

पंढरपूर तालुक्यात अतिवृष्टी आणि महापूरामुळे 65 हजार हेक्टर क्षेत्रावरील पीकांचे नुकसान.

92
0

पंढरपूर :- अतिवृष्टी आणि महापूरामुळे पंढरपूर तालुक्यातील शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे काम  पूर्ण झाले आहे. पंचनाम्यानुसार सुमारे 65 हजार हेक्टर क्षेत्रावरील विविध पिकांचे नुकसान झाले असून नुकसान भऱपाईसाठी जवळपास 98 कोटी 42 लाख 44 हजार रुपयांची मागणी केली आहे.शासन आदेशानुसार शेतकर्यांना लवकरच मदत दिली जाईल, अशी माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

मागील अनेक वर्षानंतर यावर्षी पंढरपूर तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर तालुक्यात 10 ते 16 आॅक्टोबर दरम्यान अतिवृष्टी  झाली. तालुक्यात 15 आॅक्टोबर अखेर  सरासरी 141.89 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. वार्षीक सरासरीच्या पाच पट पाऊस झाल्याने भीमा,माणनदीसह अनेक छोटयामोठ्या ओढ्यांना महापूर आला. महापूरामुळे पिकांची हाणी झाली. यामध्ये   तालुक्यातील 69 हजार 500 शेतकर्यांच्या विविध पिकांचे नुकसान झाले.

अतिवृष्टी आणि नदयांना आलेल्या  महापूरामुळे सर्वाधिक 24 हजार 136 हेक्टरवरील द्राक्ष, डाळिंब, पपई, आंबा,पेरु,चिकू, केेळीसह इतर फळबागांचे नुकसान झाले आहे. त्या खालोखाल 20 हजार 720 हेक्टरवरील ऊस पीकाचे नुकसान झाले आहे.

नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यासाठी कृषी, महसूल आणि जिल्हा परिषदेच्या कर्मचार्यांची नियुक्ती केली आहे. संयुक्त पथकाने तालुक्यातील नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे केले असून ते  जवळपास पूर्ण झाले आहेत. नुकसान झालेल्या पिकांची आणि त्यासाठी लागणार्या निधीची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आली आहे. पुराच्या पाण्यामुळे शहर व तालुक्यातील  बाधीत झालेल्या घरांचेही पंचनामे पूर्ण झाले आहेत. शासनाकडून निधी प्राप्त होताच शेतकर्यांच्या बॅंक खात्यावर  नुकसानभरपाईची रक्कम  जमा केला जाईल असेही श्री. ढोले यांनी सांगितले.