
अपघातांच्या प्रमाणात कमी करण्यासाठी विविध रस्त्यावरील वेग निश्चित
सोलापूर:- राष्ट्रीय महामार्गावरुन 90 किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने वाहने चालवता येणार नाहीत. राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक विनय कारगांवकर यांनी एक अधिसूचना जारी केली असून यानुसार विविध महामार्ग राज्य महामार्ग महानगरपालिका अथवा नगरपालिका क्षेत्रातील रस्ते यावरील वाहनांची कमाल वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार राष्ट्रीय, राज्य महामार्गावरील समतल भागात प्रतितास 90 किलोमीटर तर घाट भागात प्रतितास 50 किलीमीटरच वेग निश्चित करण्यात आला आहे. ही अधिसुचना 18 नोव्हेंबर 2019 पासून पुढील आदेशापर्यंत लागू राहतील, असे अधिसुचनेत स्पष्ट करण्यात आले आहे.
श्री.कारगांवकर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या अधिसुचनेत नमूद करण्यात आले आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ते सुरक्षा समितीने रस्ते अपघात आणि त्यामध्ये होणाऱ्या मृत्यूंमध्ये दरवर्षी दहा टक्के घट करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार राज्यातील रस्ते अपघातांच्या आढावा घेतला गेला. त्यामध्ये तीस टक्के अपघात भरधाव वेगाने वाहन चालवल्यामुळे होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यासाठी राज्यातील विविध रस्त्यांची भौगोलिक स्थिती, भूप्रदेश, घाट रस्ते, वळण रस्ते, समतल रस्ते आणि रस्त्याचा चढ उतार या बाबींचा विचार करुन वाहनांच्या वर्गानुसार कमाल वेग मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
वळण रस्त्याची त्रिज्या 50 मीटरपेक्षा कमी आहे अशा सर्व रस्त्यांवर वाहनाचा वेग ताशी तीस किलोमीटर तर बोगद्यामध्ये ताशी 80 किलेामीटर वेग निश्चित करण्यात येत आहे.