Home पंढरपूर राज्यातील सर्व प्रवर्गातील दिव्यांगांच्या दुरावस्थेला जबाबदार कोण? – यशवंत डोंबाळी यांचा लेख...

राज्यातील सर्व प्रवर्गातील दिव्यांगांच्या दुरावस्थेला जबाबदार कोण? – यशवंत डोंबाळी यांचा लेख आवश्य वाचा.

365
0

पंढरपूर:- आज राज्यामध्ये दिव्यांगांसाठी विशेष शिक्षण देणाऱ्या अनेक विशेष शाळा कार्यरत आहेत , ग्रामीण भागामध्ये जास्त प्रमाण आहे . परंतु समन्वय कुठेच दिसत नाही . विशेष शिक्षण किती वयोगटापर्यंत देण्यात यावे , याबाबत विचारभिन्नता आहे . वास्तविक दिव्यांगांसाठी लवकर निदान व उपचार पध्दतीची अंमलबजावणी तातडीने होणे गरजेचे आहे पण दुर्दैवाने होताना दिसून येत नाही .

नेमक्या कोणत्या प्रवर्गासाठी विशेष शिक्षण देण्याची गरज आहे याचे संशोधन होणे गरजेचे आहे , वयोगट ठरवणे गरजेचे आहे . वयवर्षे १८ पर्यंत विशेष शाळेत ठेवल्या जाणाऱ्या दिव्यांग मुलामुलींचे ग्रामीण भागातील शैक्षणिक पुनर्वसन हा एक अभ्यासाचाच विषय आहे . मतिमंद , बहुविकलांग यांना शैक्षणिक पुनर्वसनाबरोबर कर्मशाळेसह सर्वांगिण पुनर्वसनाचीच नितांत गरज आहे , त्यांना वयवर्षे अठरा पर्यंत फक्त विशेष शाळेत विशेष शिक्षण देवून साध्य काहीच होणार नाही . कर्णबधिर , अस्थिव्यंग व अंध प्रवर्गातील मुलेमुली इयत्ता पहिलीपासून सर्वसाधारण शाळा प्रवाहात आणण्याची आवश्यकता आहे , तिथे त्यांना सर्व शैक्षणिक व भौतिक सुविधा उपलब्ध करून द्या . तरच या तीन प्रवर्गातील दिव्यांग मुलामुलींना उच्च शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध होतील , विशेष शाळांतून ग्रामीण भागात हे शक्य नाही . दिव्यांगांसाठी शासनास खरोखरच काही करावयाचे असल्यास उपाययोजना तातडीने करण्याची गरज आहे , नाहीतर दिव्यांग पुनर्वसनाचा देखावा हा असाच पुढे चालू राहणार आहे व दिव्यांगांना मात्र याचा काहीच लाभ होणार नाही हे तितकेच सत्य आणि सद्य वास्तव आहे .
यशवंत जगन्नाथ डोंबाळी