करमाळा :- विहिरीत पडलेल्या तेरा वर्षीय मुलाला वाचविण्यासाठी गेलेल्या वडिलांचा आणि मुलाचाही मृत्यू झाल्याची घटना करमाळा तालुक्यातील मलवडी येथे शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली.
या घटनेचे सविस्तर वृत्त असे की, सार्थक उर्फ सोन्या शिवाजी कोंडलकर (वय १३) आज सकाळी नऊ वाजता वस्तीसमोर असलेल्या विहीरीत पाय घसरून पडला. सार्थक ला पोहता येत नव्हते. पाण्यात बुडत असताना सार्थने आरडाओरडा करण्यास सुरू केली. हा आवाज ऐकून वडिल शिवाजी भिमराव कोंडलकर (वय ३५) हे धावत विहिरीजवळ आले़ मुलगा पाण्यात बुडत असतानाचे पाहत त्याला वाचविण्यासाठी वडिल शिवाजी यांनी विहिरीतील पाण्यात उडी मारली. त्याला पाण्यातून वाचवून बाहेर काढत असताना सार्थकने पाण्याच्या भितीने वडिलांना मिठी मारली. यामुळे दोघेही बाप-लेक विहिरीतील पाण्यात बुडाले़ दुदैवाने दोघांचाही बुडून मृत्यू झाला. सार्थक सहावीत शिक्षण घेत होता.
विहिरीत मोठ्याप्रमाणात पाणी असल्याने मयत बापलेकाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यासाठी विहिरीवर मोठया प्रमाणात पंप लावण्यात आले आहे़. विहिरीतील पाणी काढण्याचे काम वेगाने सुरू आहे़. घटनेची माहिती मिळताच करमाळा पोलीसांनी घटनास्थळला धाव घेतली आहे.