Home सोलापूर ओढ्यात “मगर” दिसली अन शेतकऱ्याची “धांदल”उडाली  .

ओढ्यात “मगर” दिसली अन शेतकऱ्याची “धांदल”उडाली  .

963
0

शेतकरी,शेतमजूर आणि शेतीची कामे करणाऱ्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण 

 मगरीच्या शोधासाठी प्राणिमित्रांकडून ओढ्याच्या परिसरात यंत्रणा लागली 

सोलापूर- ( प्रतिनिधी ) – सोलापुरातील देगाव रोडवरील कोयना नगर जवळून जाणाऱ्या ओढ्यात शुक्रवारी दुपारी शेतीचे काम शेतमजुराचा जवळपास चार ते पाच फूट लांबीची भलीमोठी मगर दृष्टीस पडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मगर दिसताच क्षणी शेतमजुराची बोबडी वळली. धांदल उडालेल्या त्या शेतमजुराच्या आवाजाने “त्या”मगरीने जबडा उघडत ओढ्याच्या पाण्यात धपकन उडी घेतली अन निघून गेली. इकडे त्या शेतमजुराने घाबरून बाजूच्या ओढ्याच्या पाण्यातून धूम ठोकली .दिनेश घोडके याने घडलेली हकीकत आजूबाजूच्या शेतकऱ्यांना सांगितली आणि त्यांचेही डोळे विस्फारले. 
गेल्या दोन दिवसांपासून या भागातून शेतकरी,शेतमजूर तसेच शेतीची दररोज कामे करण्यासाठी ओढ्यातून मार्ग काढून जाणाऱ्या महिलांनी अक्षरशः दिसलेल्या “त्या” मगरीच्या भीतीने पाठ फिरविली आहे. शेतकरीसुद्धा या परिसरात फिरकलेला नाही. शनिवारी सकाळी या प्रभागाचे नगरसेवक गणेश वानकर यांनी याची दाखल घेतली. त्यांचे बंधू विठ्ठल वानकर यांनी प्रत्यक्ष स्पॉटवर जाऊन शेतमजूर दिनेश घोडके यांच्याकडून इतंभूत माहिती घेतली. त्यानंतर महात्मा गांधी प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. नितीन गोटे यांनी प्राणिमित्रांना घटनास्थळ भेट देण्यास सांगितले. प्राणीमित्र मुकुंद शेटे , औदुंबर गेजगे,प्रवीण जवरे आदींनी जागेवर जाऊन ज्या ठिकाणी मगर होती त्या ठिकाणाची पाहणी केली , लांबी,जाडी,उघडलेला जबडा आदींची माहिती घेतली असता याठिकाणी भारतीय जातीच्या मगरीचे वास्तव असल्याचे सांगितल्याने शेतकऱ्यांचे टेन्शन आणखीनच वाढले आहे. 
===================
== मगर असण्याची दाट शक्यता == 
ओढा जवळपास पाच ते सहा फूट खोल आहे. या ओढ्यामध्ये मांगूर जातीचे मातीचे मासे मोठ्या प्रमाणावर असून मगरीचे ते आवडते खाद्य आहे. मगरीच्या वाढीसाठी या ठिकाणी अनुकूल वातावरण आहे. मगरीचे पालनपोषण होण्यास हा परिसर अनुकूल आहे. शेतकरी दिनेश घोडके यांनी केलेले वर्णन हे मगरीचेच आहे. गोड्या पाण्यातील भारतीय मगर असावी. त्यामुळे मगरीच्या शोधासाठी किमान तीन ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावणे आवश्यक आहे. वनविभागाला तशी विनंती करणार असल्याचे सांगतानाच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी, शेतमजूर व शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन वन्यजीव प्रेमी संस्थेचे अध्यक्ष मुकुंद शेटे यांनी सांगितले. 
== मगरीच्या शोधासाठी सोललेल्या कोंबड्या == 

मगरीसाठी लावलेली कोंबडी

ओढ्याच्या परिसरात मगर दिसल्याचा पार्श्वभूमीवर प्राणी मित्रांनी तातडीने जागेची व परिसराची पाहणी करून त्या ठिकाणी मगरीसाठी खाद्य म्हणून आणि नेमकी मगर आहे कि अन्य कोणता मगर सदृश्य प्राणी आहे , याची खातरजमा करण्यासाठी सोललेल्या कोंबड्या ठिकठिकाणी बांधल्या आहेत. काही तास वाट पाहून पुन्हा उद्यापासून परिसरात ट्रॅप कॅमेरे लावण्याची तयारी करणार असल्याचे विठ्ठल वानकर यांनी सांगितले.
==================
== प्राणी संग्रहालयातून मगरीचे पिल्ले गायब झाली होती ==
विजापूर रोडवरील रेवण सिद्धेश्वर मंदिर परिसरात महापालिकेच्या महात्मा गांधी प्राणिसंग्रहालयातून मगरीची दोन पिल्ले गायब झाली होती. त्या घटनेला जवळपास पाच ते सहा वर्षाचा कालावधी लोटला आहे. एक पिल्लू तेथेच नाल्यात सापडले होते. जी दोन पिल्ले गायब झाली त्यातील हे एक मगरीचे मोठे झालेले असावे असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. नितीन गोटे यांनी मात्र आपण सध्या प्राणिसंग्रहालयाच्या विकासात गुंतलो असून मगर शोधण्याचे काम वन विभागाचे असल्याचे सांगून हात झटकले आहेत.तर वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी निकेतन जाधव यांना विचारले असता त्यांनी प्रथम आमची माणसं जातील आणि त्यानंतर नेमके काय आहे याची माहिती घेऊ असे ते म्हणाले. 

आसबे न्यूज ब्युरो