Home पंढरपूर ह.भ.प. निवृत्ती महाराज वक्तेंवर गुन्हा दाखल .

ह.भ.प. निवृत्ती महाराज वक्तेंवर गुन्हा दाखल .

6364
0

पंढरपूर :- राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवारांवर ते हिंदू विरोधी असल्याची टीका करुन प्रकाशझोतात आलेले राष्ट्रीय वारकरी परिषदेचे संस्थापक ह.भ.प. निवृत्ती महाराज वक्तेंवर जातीय द्वेष निर्माण केल्यावरुन कल्याणच्या खडकपाडा पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटी अंर्तगत गुन्हा दाखल करण्यात आलाय.
ॲड. आशिष शुध्दोधन इंगळे (वय- ३१ रा. ४०३, बी विंग, सीझन्स रेसिडेन्सी, डी मार्ट जवळ, खडकपाडा, कल्याण) यांनी गुन्हा दाखल केलाय.
गुन्हा रजिस्टर नंबर २९/२०२० नुसार, ॲड. इंगळे यांच्या व्हॉट्सअप वर ८ फेब्रुवारी रोजी एक व्हिडिओ आला. या व्हिडिओ मध्ये वक्ते महाराज हे हातामध्ये लाल पुस्तक घेवून प्रवचन देताना दिसत आहेत. या प्रवचणात महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अपशब्द वापरले. अनुसूचित जातीच्या सदस्यांचा पानउतारा केला. अनुसुचीत जातीच्या सदस्यांविरोधात समाजात शत्रूत्वाची आणि द्वेषाची भावना महाराजांच्या वक्तव्यावरुन दिसुन आल्याचे या फिर्यादी म्हटलं आहे. तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अनादर केल्याचे दिसत आहे. महाराज आपल्या वक्तव्यात मनूस्मृतीचे पालन करण्याची चिथावणी सर्व सामान्य जनतेस देत आहेत. तसेच कायदेशीर व्यवस्थेबद्दल तुच्छतेची भावना नागरिकांमध्ये निर्माण करीत असल्याचे नमूद केले आहे.
ॲड. इंगळेंच्या या फिर्यादीवरुन वक्ते महाराजांवर भादवि 1860 चे १५३ A (१) तसेच अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा १९८९ नुसार ३(१) (U ), 3(1)(V) नुसार ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

४ फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना हिंदू विरोधी म्हणून वक्ते महाराज प्रकाशझोतात आले होते.
४ फेब्रुवारी रोजी वक्ते महाराजांनी राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या वतीने एक पत्रक काढले होते. त्यामध्ये खा. पवार हे हिंदू विरोधी आहेत. त्यांना हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमांना बोलवू नये. त्यांना रामायण मान्य नाही. समर्थ रामदासांचा उल्लेख ते एकेरी करतात. ते देव,धर्म मानत नाहीत. नास्तिक आणि पुरोगामी लोकांना ते पाठिंबा देतात असे आरोप केले होते. याविषयी बातम्या प्रसिद्ध झाल्यावर महाराजांनी हात झटकले होते. मात्र तोपर्यंत महाराजांच्या वादग्रस्त क्लिप सोशल मिडियावर व्हायरल झाल्या होत्या. त्यापैकी एका क्लिप वरुन त्यांच्या वर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.