व्हीआयपी दर्शनाची पास विक्री करणाऱ्या एजेंट वर गुन्हा दाखल . समितीचे सदस्य संशयाच्या भोवऱ्यात.

पंढरपूर :- श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनाचा व्हीआयपी पासच्या दर्शनाची विक्री करणाऱ्या एजेंटवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ माजली आहे. या घटनेमुळे दर्शनाचा काळाबाजार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गुरुवार ३० ऑगस्ट रोजी हैदराबादचे भाविक दांपत्य श्री विठ्ठलाच्या दर्शनाला आले होते. त्यावेळी मंदिर परिसरात फिरणाऱ्या कैलास डोके माळी (रा. विठ्ठल मंदिर परिसर पंढरपूर) याने या भाविकांना झटपट व्हीआयपी दर्शन करुन देण्याचे अमीष दाखवले. पैसे दिल्यास व्हीआयपी पास देवून व्हीआयपी दर्शन घडवून आणतो असे सांगितले . त्यानुसार कैलास याने मंदिर समितीच्या कार्यालयातून श्रीनिवासराव प्रसादराव पिठे (वय-५०) आणि त्यांची पत्नी लक्ष्मी पिठे (दोघे रा. जयप्रकाश नगर अमिरपेठ हैदराबाद) यांच्या नावे व्हीआयपी पास घेतला. आणि तो पास मिळवून देण्यासाठी ८०० रुपये घेतले.
व्हीआयपी गेट मधून दर्शनाला जात असताना बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांना याचा संशय आल्याने त्यांनी चौकशी केली. या चौकशी मध्ये पिठे यांनी पैसे देवून व्हीआयपी दर्शन पास घेतल्याचे सांगितल्यामुळे पोलिसांनी मंदिर समितीची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस नाईक वामन यलमार यांनी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणामुळे श्री विठ्ठल दर्शनाच्या झटपट दर्शनाचा काळाबाजार बाहेर आला आहे. समितीच्या वतीने समितीचे अधिकारी आणि सदस्य यांच्या आदेशा शिवाय व्हीआयपी पास दिले जात नाहीत. त्यामुळे हा व्हीआयपी पास कोणाच्या आदेशावरून देण्यात देण्यात आला याची चौकशी करुन संबधितावर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाविकांमधून केली जात आहे.

error: Content is protected !!