विषय समित्यांच्या निवडी चालल्या “जातीवर”.

पंढरपूर :- पंढरपूर नगरपालिकेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतीपदाच्या निवडी शनिवारी होत आहेत. यासाठी पदासाठी जशी नगरसेवकांनी फील्डिंग लावली आहे . त्याच प्रमाणे परिचारकांनी देखिल आमदारकी साठीच समिकरणे मांडली आहेत. जातीय समिकरणावर सभापती निवडी होणार असल्याने शेवटी “जातीवर”च होणार हे सत्य आहे.
उपनगराध्यक्ष आणि सभापतींची मुदत संपल्याने नविन निवडींचा कार्यक्रम जाहीर झाला आहे . ज्या मोठ्या राजकीय महत्वकांक्षेसाठी स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात ठेवल्या जातात . ती विधानसभेची निवडणूक याच वर्ष्यात होणार आहेत. त्यामुळे मतांवर डोळा ठेवून संधी देण्यात येणार आहे. संतपेठ हा परिचारकांचा पारंपरिक विरोधी भाग आहे. त्यामुळे या भागातून नगरसेवक सुजितकुमार सर्वगोड किंव्हा लतिका डोके यांना उपनगराध्यक्षपदाची लॉटरी लागू शकते. सर्वगोड हा दलित चेहरा तर डोके हा ओबीसी चेहरा असल्याने विधानसभेला फायदा होऊ शकतो असे परिचारकांना वाटते.
पाणी पुरवठा आणि बांधकाम या मलईदार समिती साठी मोठी रस्सीखेच सुरु आहे. कारण मोठे टेंडर याच विभागात जास्त असल्याने खरे “विकासकाम” केल्याचे समाधान नगरसेवकांना मिळते. यासाठी विक्रम शिरसट , लतिका डोके , भाग्यश्री शिंदे , रेहाना बोहरी , गुरुदास अभ्यंकर, सुजाता बडवे यांच्यासह अनेकजण इच्छुक आहेत. आरोग्य समितीवर गंगेकर माता-पुत्रा पैकी एकाची वर्णी लागू शकते. शिक्षण आणि महिला बालकल्याण साठी मात्र गर्दी होताना दिसत नाही. कारण तिथे विकासाची संधी कमी असल्याने कार्यसम्राट नगरसेवकांचा कल या समित्यांकडे जास्त नसतो. मात्र कोणी कितीही फील्डिंग लावली तरी तुमची “जात” बघूनच संधी दिली जाणार असा संदेश परिचारकांनी संबंधितांना दिला आहे.
हे झाले विषय समित्यांच्या निवडीचे. मात्र ज्या आमदारकी साठी राजकारण “जाती”वर जात आहे. त्या विधानसभेचा परिचारकांच्या घरातील उमेदवार कोण? हेच अजून फायनल झाला नसल्याची चर्चा होताना दिसत आहे. मोठ्या मालकांनी मैदानात यावे ही जुन्या जाणत्या नेत्यांची भावना आहे. तर नेणते नेते प्रणव मालक म्हणजे मोठ्या मालकांची सावली म्हणून आवाज देताना सोशल मिडियावर दिसत आहेत. “उमेश मालकांनी किती दिवस पडद्याआड काम करायचे” असा नवा सुर आता परिचारक गटाचे बाहुबली नेते उमेश मालकांचे सवंगडी लावताना दिसत आहे. मोठे मालक , उमेश मालक आणि प्रणव मालकांच्या चर्चेत या आमदारकी प्रमुख दावेदार आमदार प्रशांत मालक मात्र कुठेच दिसत नाहीत . हा आता या विषय समित्यांच्या सभापतिपदाच्या निवडी करण्याचे अधिकार मात्र आमदार प्रशांत मालकांकडे आहेत. तर दुसरी कडे मिस्टर नगराध्यक्ष नागेश काका भोसलेंनी देखिल आपल्या गनिमी काव्याने विधानसभेची मोर्चेबांधणी सुरु केल्याची चर्चा मतदारसंघात सुरु आहे.
विषय समित्यांच्या निवडी कितीही “जातीवर” गेल्या तरी नगरपालिकेला मतदार मत देताना विचार वेगळा करतो विधानसभा , लोकसभेला वेगळा. आणि हेच नगरसेवक नगरपालिकेच्या निवडणुकीला मतदारांना सांगतात की विधानसभेला काहीही कर आता माझ्यासाठी मत दे . त्यामुळे भविष्यात “विकास” की “जात” आगामी विधानसभाच ठरवेल.

error: Content is protected !!