पोलिस निरिक्षक दयानंद गावडेंची पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात नियुक्ती करा- नेटकऱ्यांची सोशल मिडियावर मागणी .

पंढरपूर :- सोलापूर ग्रामीण पोलिस दलात ऑक्टोबर २०११ ते मार्च २०१६ या पाच वर्षात आपल्या कामाची छाप पाडणारे पोलिस निरिक्षक दयानंद गावडेंची नियुक्ती पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात करण्याची मागणी सध्या सोशल मिडियावर जोर धरत आहे. आज पुण्यावरुन गावडेंची बदली सोलापूर ग्रामीण पोलिस दलात झाली आहे. नॉन पॉलिटिकल फोरम ने यामध्ये पुढाकार घेतला आहे.


लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरु आहे. पो.नि. दयानंद गावडेंची बदली सोलापूर ग्रामीण पोलिस दलात झाली आहे. पो.नि. गावडे हे २०११ पासून सोलापूर जिल्ह्यात कार्यरत होते. ऑक्टोबर २०११ ते ऑगस्ट २०१२ या काळात त्यांनी जिल्हा विशेष शाखेला काम केले. तर ऑगस्ट २०१२ ते जानेवारी २०१३ ते पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात पोलिस निरिक्षक म्हणून रुजू झाले. आपल्या सहा महिन्याच्या कार्यकाळात त्यांनी पंढरीच्या कायदा आणि सुव्यवस्थेसह वाहतूक , सामाजिक सलोखा , कम्युनिटी पोलिसिंगच्या माध्यमातून शहरात पोलिसांचा धाक निर्माण केला होता. एक धाडसी अधिकारी म्हणून त्यांची याच काळात ओळख निर्माण झाली. जानेवारी २०१३ ते जून २०१४ साली ते सांगोल्यात कार्यरत होते. तेथून पुन्हा त्यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला काहीकाळ सेवा दिला. आणि मार्च २०१५ ते मे २०१६ त्यांनी पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात सेवा बजावली. पंढरपूरच्या आषाढी यात्रेदरम्यान मराठा समाजाने मुख्यमंत्र्यांचा शासकीय महापुजेला विरोध केला होता. यावेळी यात्राकाळात हे आंदोलन सामोपचाराने हताळणे गरजेचे होते. यासाठी पोलिस प्रशासनाने अनेक जुन्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतले होते. त्यामध्ये पो.नि. दयानंद गावडेंचा समावेश होता.


आपल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात गावडेंनी जिल्ह्यात विविध ठिकाणी आपले कर्तव्य बजावले. आता निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशा अनुभवी अधिकार्याची नियुक्ती पंढरपूर शहरला व्हावी अशी मागणी सोशल मिडियावर केली जात आहे. पंढरपूरची गुन्हेगारी पार्श्वभूमी पहाता पोलिस उपाधिक्षक डॉ. कवडेंच्या जोडीला शहरात एका कार्यक्षम अधिकाऱ्याची गरज भासत असल्याचे सोशल मिडियावर मांडले जात आहे. नॉन पॉलिटिकल फोरमच्या वतीने जिल्हा पोलिस पोलिस अधिक्षक मनोज पाटील आणि पोलिस उप अधिक्षक डॉ. सागर कवडेंची भेट घेवून मागणी करण्यात येणार आहे.

error: Content is protected !!