माढ्याचा प्रचार थंडावला. वाचा कोणाचे पारडे झाले जड.

पंढरपूर :- राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या माढा लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवारांनी माढा प्रतिष्ठेचा विषय केला आहे. गेल्या आठ दिवसात भाजपच्या वतीने प्रधानमंत्री मोदी पासून मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री , राज्याचे मंत्री तर राष्ट्रवादीच्या वतीने खुद्द शरद पवारांनी प्रचाराचा धुराळा उडवला. तर जिल्ह्यात मोहिते पाटलांची प्रतिष्ठा देखिल पणाला लागली आहे.
माढा लोकसभा स्थापनेपासून चर्चेत असलेला मतदारसंघ. २००९ ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी निवडणूक लढवली आणि जिंकली. २०१४ साली मोदी लाटेत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटलांनी राष्ट्रवादीची विजयी पताका फडकवली. आता मोहिते पाटील भाजपवासी झालेत.
२००९,२०१४ राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले. हा आता भूतकाळ झाला.२०१९ च्या रणसंग्रामात पवारांनी उमेदवारी जाहीर केली आणि अचानक माघार घेतली. प्रचंड नाट्यमय घडामोडी नंतर भाजपाची उमेदवारी नाकारून जिल्हा परिषद अध्यक्ष संजय मामा शिंदे राष्ट्रवादी कडून लोकसभेसाठी मैदानात उतरण्यास तयार झाले. तर भाजपने सातारा जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष रणजितसिंह निंबाळकरांना आपल्या ताफ्यात घेवून माढ्यातून उमेदवारी दिली.

भाजपचे वीर.
प्रचाराला सुरवात झाली. मुख्यमंत्र्यांनी मोहिते पाटील, साडेचार वर्ष बांधावर असणारे परिचारक, कॉंग्रेसचे नेते कल्याण काळे, करमाळ्याचे जयवंत जगताप , डॉ. बी पी रोंगे यांना भाजपात प्रवेश दिला. आणि भाजपची तटबंदी मजबूत केली. सध्या भाजपची संपूर्ण मदार मोहिते पाटील गट,माढ्यातुन आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार धनाजी साठे, सेना नेते शिवाजी सावंत, संजय कोकाटे, यांच्यावर आहे. तर सांगोल्यातुन माजी आमदार शहाजी पाटील, श्रीकांत देशमुख , कल्याण काळे यांच्यावर जबाबदारी आहे. करमाळ्यात आमदार नारायण पाटील, माजी आमदार जयवंत जगताप यांच्यावर भिस्त आहे. माळशिरस मध्ये खूद्द मोहिते पाटील असल्याने हा गड भेदणे राष्ट्रवादीला जड जाणार असे दिसते. त्यामध्ये अजून डॉ. धवलसिंहांची भर पडली आहे. माण-खटाव मधून कॉंग्रेसचे आमदार जयकुमार गोरे आणि राष्ट्रवादीचे शेखर गोरेंनी उघडपणे भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. फलटण हे रणजितसिंह निंबाळकरांचे होम पिच असल्याने ते स्वतः तिथे किल्ला सांभाळत आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिष्ठेचा विषय केल्याने त्यांनी माढ्याची तटबंदी मजबूत केल्याचे चित्र दिसत आहे. हे चेहरे भाजपच्या स्तेजवर पाहता निंबाळकरांचा विजय सोपा मानला जातो. पक्ष म्हणून निंबाळकरांना काहीच अडचण नसल्याचे चित्र आहे.
मात्र दुसरीकडे मोहिते पाटील, कल्याण काळे, खुद्द उमेदवार निंबाळकरांना शेतकऱ्यांची देणी थकवल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

राष्ट्रवादीचे सेनापती.
राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांच्या बलस्थानाचा विचार केल्यास, माढा शिंदे बंधूंचा गड मानला जातो. तर संजय शिंदेंनी २०१४ साली करमाळ्यातून विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यामुळे त्यांचा हक्काचा गट करमाळ्यात कार्यरत आहे. तसेच रश्मी बागल गटाची जादाची कुमक शिंदेंना मिळत आहे. सांगोल्यातून जेष्ठ आमदार गणपतराव देशमुख, आमदार भारत भालके, माजी आमदार दिपक साळुंखे पाटील किल्ला लढवत आहेत. माळशिरस मध्ये आमदार रामहरी रुपणवर , कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांच्यावर राष्ट्रवादीची भिस्त आहे. मोहिते पाटलांच्या भाजप प्रवेशाने माळशिरस मधुन राष्ट्रवादी हद्दपार झाल्याचे चित्र आहे. फलटण मध्ये रामराजे निंबाळकर मैदानत उतरलेत. माण-खटाव मध्ये राष्ट्रवादीची भिस्त स्थानिक नेत्यांवर असल्याने त्याठिकाणी शिंदेंची अडचण होणार आहे.
अकलूजच्या सभेत मोदींनी पवारांवर टीका करत मोहिते पाटलांची स्तुती केली. तर पवारांनी नातेपुतेच्या सभेत मोहिते पाटलांवर चौफेर टीका करत मतदारांना शपथ देवुन भावनिक साद घातली.
दोन्ही बाजुचे सेनापती , सैन्य पाहिल्यास आता मतदार काय करणार? हे महत्वाचे आहे. माढा लोकसभेत सोलापूर जिल्ह्यातील चार आणि सातारा जिल्ह्यामधिल दोन विधानसभा मतदारसंघ येतात. संजय शिंदे माढ्याचे असल्याने जिल्ह्यातला आपला उमेदवार म्हणून त्यांचे पारडे जड असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील साखर कारखानदारीचा निवडणूकांवर परिणाम कायमच होतो. उस बिलाचा विचार केल्यास शिंदे बाजी मारतील अशी स्थिती आहे. तर दुसरीकडे भाजपचा विचार केल्यास एक पक्ष म्हणून भाजपचे पारडे जड असल्याचे चित्र आहे. सहाही विधानसभा मतदारसंघात नेत्यांची असलेली कुमक निंबाळकरांचा विजय सुकर करेल असे दिसते. मात्र सोलापूर जिल्ह्यातील मतदारांनी निंबाळकरांना स्विकारणे गरजेचे आहे.
शेवटी लोकशाहीत मतदार राजा असतो. त्याचे वजन कोणाच्या पारड्यात पडते हे २३ मे रोजीचे आपल्याला स्पष्ट होईल.

error: Content is protected !!