वंचित आघाडीचे संघटक माऊली हळणवर हल्ल्या प्रकरणी कॉंग्रेस नेत्यासह आठ जणांवर विनयभंगासह मारहाणीचा गुन्हा दाखल.

पंढरपूर :- वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक माऊली हळणवर आणि त्यांचे बंधू तानाजी हळणवर यांच्या झालेल्या प्राणघातक हल्ल्या प्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आठ आरोपींच्या विरोधात मारहाण , विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये कॉंग्रेसच्या एका नेत्याचा समावेश आहे. सदाशिव घोडके , गोपीनाथ घोडके, प्रकाश घोडके (रा . सोलापूर) तसेच रामभाऊ तरंगे , शामराव तरंगे , सरूबाई तरंगे आणि सिताबाई ओकसे, रायाप्पा हळणवर आणि इतर अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल झाला आहे. रायाप्पा हळणवर हे कॉंग्रेसचे नेते आहेत.
मंगळवारी रात्री आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून यातील जखमी तानाजी हळणवर यांच्या कडे त्यांनी व्याजाने घेतलेल्या पैशाची मागणी केली. पैसे न दिल्यास जबरदस्तीने घर खाली करण्याचा प्रयत्न केला. तसेच फिर्यादी माऊली हळणवर हा तानाजी हळणवरला मदत करतो म्हणून तलवारीने मारहाण केली. तसेच तेथे उपस्थित साक्षीदार महिलेच्या अंगाशी झोंबाझोंबी करुन अंगावरचे कपडे फाटे पर्यंत मारहाण केली. अशा आशयाची फिर्याद मोहन उर्फ माऊली हळणवर यांनी दाखल केली आहे.
यामधिल संशयित आरोपींमध्ये कॉंग्रेसचे नेते आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक रायाप्पा हळणवर यांचा देखिल समावेश आहे.
हा गुन्हा घडण्यापूर्वी यातील जखमी तानाजी हळणवर यांच्या पत्नी सुरेखा हळणवर यांनी या घोडके कुटुंबाच्या त्रासाला वैतागून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. व्याजाने घेतलेल्या पैशात सावकाराने जमीन हडप केली असून राहते घर देखिल सावकार मागत होता. यामुळे सुरेखा हळणवर यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता . या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल असताना देखिल आरोपींनी पुन्हा मारहाण करण्याचे धाडस केले. त्यामुळे हे प्रकरण नक्की कोणत्या कारणावरून घडले आहे? यामध्ये लोकसभा निवडणूकीची काही पार्श्वभूमी आहे का ? याचा तपास देखिल होणे गरजेचे आहे.
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. बाळासाहेब आंबेडकर गुरुवारी हळणकर कुटुंबाची घेणार भेट .
माऊली हळणवर हे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक आहेत. त्यांनी निवडणूक काळात बाळासाहेबांचा प्रचार केला होता. धनगर समाज वंचित आघाडीकडे वळवण्यात हळणवरांचा मोठा वाटा आहे. हळणवर यांच्यावर हल्ला झाल्याचे वृत्त ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांना समजल्यानंतर त्यांनी प्रकरणाची सखोल माहिती घेवून माऊली हळणवर यांच्याशी संवाद साधला. दरम्यान गुरुवारी आंबेडकर हे हळणवर यांची भेट घेण्यासाठी पंढरपूरला येत असल्याची माहिती सुत्रांनी दिली .
आज वंचित बहुजन आघाडी , बळीराजा शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना निवेदन दिले असुन आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली आहे.

error: Content is protected !!