दुष्काळी प्रश्नासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार- ॲड. बाळासाहेब आंबेडकर

सांगोला तालुक्यातील चारा चावण्यांना दिली भेट.
सांगोला :- राज्यातील दुष्काळ परिस्थिती गंभीर आहे. चारा आणि पाण्यासाठी जनावरांबरोबरच माणसांचे देखिल स्थलांतर होत आहे. यावर राज्य सरकारने कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. या मागण्यासह इतर मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ ११ मे रोजी मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याची माहिती ॲड. बाळासाहेब आंबेडकरांनी सांगोल्यात दिली. यावेळी नगरसेवक आनंद चंदनशिवे, अर्जुन सलगर , बाळासाहेब बंडगर , विक्रांत गायकवाड , नागेश रणखांबे , बबन शिंदे आदी उपस्थित होते.
ॲड . आंबेडकरांनी यावेळी पशुपालक, शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावरून शेतकऱ्यांनी चारा छावणीत येणाऱ्या अडचणी मांडल्या. छावणीत जनावरांसोबत एका व्यक्तीला थांबावे लागते. त्यामुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण होत असल्याची व्यथा शेतकऱ्यांनी मांडली. तसेच ओला चारा मिळत नाही. उसामुळे जनावरांच्या जिभेला जखमा होत आहेत. अशा व्यथा मांडल्या. यावर आपण ११ मे रोजी मुख्यमंत्र्यांना भेटून याची माहिती देणार आहे . तसेच छावणीत राहणाऱ्या पशुपालकाला रोजगार हमीची मजुरी देण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी संगितले.
हा दुष्काळ जितका निसर्गाच्या लहरीपणा मुळे आहे. त्यापेक्षा नियोजनाचा अभाव असल्याने पडला असल्याचा आरोप त्यांनी केला. पाण्याचे ठेकेदार राज्यात निर्माण झाल्याने काही मोजका भागच पाणीदार असल्याची टीका त्यांनी केलीय.
ठिकठिकाणी स्वागत पण हारतुरे टाळले. वाढदिवसानिमित्ताने दुष्काळी भागात मदत करण्याचे आवाहन.
पुण्यावरुन टेंभुर्णी मार्गे पंढरपूर , सांगोला तालुक्यात ॲड. आंबेडकरांचे आगमन झाले. ठिकठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी लोक जमा झाले होते. मात्र बाळासाहेबांनी हारतुरे घेणं टाळल. तर १० मे रोजी आपल्या वाढदिवसानिमित्त कोणतेही कार्यक्रम न घेता. दुष्काळी भागात मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. जनावरांच्या चाऱ्याची पाण्याची सोय करावी. असे त्यांनी सांगितले.

error: Content is protected !!