आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला वंचित आघाडीचा मदतीची हात.

ॲड. बाळासाहेब आंबेडकरांच्या जन्मदिनानिमित्त जपली सामाजिक बांधिलकी.

सोलापूर :- अक्षय तृतीयेच्या दिनीच सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवली होती. मोहोळ तालुक्यातील येनकी गावच्या तुकाराम माने या शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. या आत्महत्यागृस्त शेतकरी कुटुंबाला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मदतीचा हात देण्यात आलाय. ॲड. बाळासाहेब आंबेडकरांच्या जन्मदिनानिमित्त सोलापूरचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. पंचवीस हजार रुपयांचा धनादेश आज या कुटुंबाला देण्यात आला. या आठवड्यात ॲड. आंबेडकर आणि खासदार ओवेसींचा जन्मदिवस साजरा होणार आहे.
तुकाराम माने या शेतकऱ्याने डाळिंबावर फवारण्यासाठी आणलेले विषारी किटकनाशक प्राशन करुन त्यांनी ही आत्महत्या केली होती. माने यांच्यावर युनियन बॅंकेचे १२ लाखाचे होते कर्ज तसेच हे कर्ज फेडून कर्जमाफीचा फायदा घेण्यासाठी त्यांनी खासगी सावकाराकडून तीन लाखाचे कर्ज घेतले. मात्र बॅकेने घराच्या कर्जाचे हप्ते भरुन घेतल्याने कर्जाची रक्कम जैसे थेच राहिली शिवाय खासगी सावकाराचे कर्ज वाढले. अशास्थितीत शेतातील ऊसही जळून गेला आणि आता डाळिंबीची बागही जळण्याच्या मार्गावर असल्याने कर्ज फेडायचे कसे या विवंचनेत अखेर तुकाराम माने यांनी अखेर आत्महत्येचा मार्ग स्विकारला होता.
सोलापूर जिल्ह्यासह राज्यात दुष्काळ पडला आहे. ८ मे रोजी वंचित आघाडीचे अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकरांनी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर या दुष्काळी तालुक्यांचा दौरा केला होता. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
याच दौऱ्या दरम्यान ॲड. बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या जन्मदिनी शेतकर्यांना मदतीचे आवाहन केले होते. दुष्काळी भागातील जनावरांना चारा, पिण्याचे पाणी, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याच्या सुचना त्यांनी केल्या होत्या.
सोलापूरचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी माने कुटुंबाची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. पंचवीस हजारांची आर्थिक मदत दिली. तसेच पुढील आठ दिवस चारा छावण्यावर जनावरांना चारा आणि पाणी, छावणीत राहणाऱ्या शेतकऱ्यांना भोजन देखिल दिले जाणार असल्याची माहिती नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी दिली.

error: Content is protected !!