समाधान आवताडे आणि शैलाताई गोडसेंची बंडखोरी परिचारकांच्या पथ्थ्यावर!

आमदार भारत भालकेंची डोकेदुखी वाढणार.

पंढरपूर :- विधानसभेचे बिगूल वाजले असून राज्यासह पंढरपूर विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आलाय. भाजप आणि सेने कडून इच्छुक असणारे समाधान आवताडे आणि शैलाताई गोडसेंनी बंडाची तयारी केली आहे. विद्यमान आमदार भारत भालकेंनी राष्ट्रवादी तर माजी आमदार सुधाकरपंत परिचारकांनी रयत क्रांतीची उमेदवारी घेतली आहे. मात्र आवताडे आणि गोडसेंची बंडखोरी परिचारकांच्या पथ्थ्यावर पडणार असे चित्र दिसत आहे.
गेली पाच वर्ष परिचारकांनी भाजपचे काम प्रामाणिकपणे केले. जिल्ह्यात भाजपाची ताकत वाढवली. मात्र पंढरपूरची जागा मित्रपक्षाला सुटल्याने त्यांना रयत क्रांतीच्या माध्यमातून मतदारांसमोर जावे लागत आहे. चिन्ह वा पक्ष कोणताही असलातरी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात परिचारकांना माननारा मोठा गट कार्यरत आहे. त्यामुळे पक्षाचा विशेष फरक पडणार नाही.
दुसरीकडे भाजपात प्रवेश करुन परिचारकांची गोची करण्याचा मनसुबा घेवून गेली दोन महिने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ माजविणारे आमदार भारत भालकेंनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यांनी देखिल हॅटट्रिक करण्यासाठी कंबर कसली आहे. मात्र यावेळी परिचारक गटाचे कुटुंब प्रमुख खुद्द माजी आमदार सुधाकरपंत परिचारकांच्या उमेदवारीमुळे भालकेंपुढे मोठे आव्हान उभे आहे.
परिचारकांची पंढरपूर नगरपालिका, पंचायत समिती तसेच मतदारसंघातील जिल्हा परिषद गटात सत्ता आहे. तसेच पंढरपूर बाजार समिती दुधसंघ बॅंकेच्या माध्यमातून परिचारक थेट मतदारांशी जोडले गेले आहेत. त्यातच सुधाकरपंतांच्या रुपाने हुकमी एक्का परिचारक गटाने बाहेर काढल्याने भालकेंपुढे एक आव्हान उभे करण्यात परिचारक यशस्वी झाले होते.
आता दामाजी कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे आणि शिवसेनेच्या नेत्या शैलाताई गोडसे यांनी देखिल बंडाची तयारी केल्याने यांचा मोठा फटका भालकेंना बसण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.
समाधान आवताडे यांची मंगळवेढ्याच्या राजकारणावर मजबूत पकड आहे. दामाजी कारखाना , तालुक्यातील ग्रामपंचायती, विविध कार्यकारी सोसायट्या आवताडेंच्या ताब्यात आहेत. त्यामुळे मंगळवेढ्यात आवताडेंचे पारडे जड आहे . २०१४ च्या निवडणूकीत मंगळवेढा तालुक्यातून आवताडे प्रथम क्रमांकावर होते. भालके दुसऱ्या तर परिचारक तिसऱ्या स्थानी होते. आवताडेंचे बंड हे भालकेंसाठी डोकेदुखी ठरणार असे दिसत आहे.
शैलाताई गोडसे यांनी देखिल दोन वर्षापासून मतदारसंघात एक नियोजनबद्ध कार्यक्रम हाती घेतला आहे. मंगळवेढ्या पाणी प्रश्नावर आंदोलन असो वा सरकारकडे पाण्यासाठी मागणी असो. गोडसेंनी अत्यंत आक्रमकपणे भुमिका मांडल्या. मतदारसंघात सण, उत्सव , आंदोलन, नागरी समस्या, आदी माध्यमातून मतदारांशी कायम संपर्क ठेवला. कृष्णा-भीमा स्थिरीकरणा सारखा राज्यस्तरीय प्रश्नाला हात घालून त्यांनी आपले अस्तित्व दाखवून दिले.
परिचारक गटाने आपल्या ताब्यातील युटोपियन , पांडुरंग कारखान्याच्या एफ,आर,पी ची रक्कम असो वा इतर सहकारी संस्थांचा कारभार यशस्वीरित्या सांभाळला आहे. हि त्यांची जमेची बाजू आहे. तर भालकेंच्या ताब्यातील विठ्ठल साखर कारखाना चारही बाजूने अडचणींचा सामना करीत आहे.
या मतदारसंघात जातीय समिकरणांचा विचार केल्यास भालके, आवताडे, आणि गोडसे यांच्यामध्ये मतविभागणी अटळ आहे. या मतविभागणीचा फटका आमदार भालकेंनी बसणार असे जाणकारांचे मत आहे.
आवताडे, गोडसेंनी उमेदवारी अर्ज भरण्याचे जाहीर केले असले तरी अर्ज काढून घेण्याच्या दिवसापर्यंत अनेक घडामोडी घडून नवे राजकीय चित्र दिसले तर आश्चर्य वाटयला नको. मात्र परिचारक गटाकडून आवताडे , गोडसेंची उमेदवारी शेवटपर्यंत रहावी ह्यासाठीच प्रयत्न होतील असे दिसते.

error: Content is protected !!