बबन दादा शिंदेंची घरवापसी तर उत्तम जानकरांचे पुन्हा पक्षांतर .

मोहिते पाटलांची जिल्ह्याच्या राजकारणावरची पकड मजबूत.

शिंदे माढ्यातून तर जानकर माळशिरस मधून राष्ट्रवादी कडून लढणार
पंढरपूर :- विधानसभेसाठी अर्ज भरण्याची मुदत काही तासांवर येवून ठेपली असताना सोलापूर जिल्ह्यातील राजकीय नाट्य मात्र संपण्याचे चिन्ह दिसत नाही. गेली दोन महिन्यापासून पक्ष प्रवेशासाठी भाजपचा उंबरठा झिजवणारे माढ्याचे आमदार बबन दादा शिंदेंची अखेर घरवापसी झाली आहे. तर २००९ पासून आमदार होण्यासाठी पक्षांतर करणारे उत्तम जानकरांनी पुन्हा पक्षांतर केले असुन ते आता भाजपा ऐवजी राष्ट्रवादी मधून माळशिरस विधानसभा लढणार आहेत.
राष्ट्रवादीच्या आज जाहीर झालेल्या यादीत शिंदे आणि जानकरांना उमेदवारी दिली गेली आहे.

माढ्यातून सहाव्यांदा विधानसभेला सामोरे जाणारे आमदार बबन दादा शिंदे हे दोन महिन्यापासून भाजप प्रवेशासाठी बाशिंग बांधुन बसले होते अशी चर्चा जिल्ह्यात सुरु होती . मात्र माढ्यातून शिंदे विरोधकांनी त्यांच्या भाजप प्रवेशाला कडाडून विरोध केला. गेल्या दहा वर्षापासून मोहिते पाटीलांना केलेला विरोध शिंदे बंधूंना महागात पडला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार सोलापूरात येवून मेळावा घेतला. या मेळाव्याला शिंदे बंधूंनी दांडी मारली होती. अनेक मार्गाने त्यांनी भाजप प्रवेशासाठी प्रयत्न केले पण यश मिळाले नाही. अखेर त्यांना घड्याळ हाती घ्यावे लागले.
माळशिरस मध्ये देखिल मोहिते पाटलांचे पारडे जड झाल्याचे दिसत आहे. त्यांचे पारंपरिक विरोधक उत्तम जानकरांनी शह देण्यात मोहिते पाटील यशस्वी झाले आहेत. त्यामुळे जानकरांनी राष्ट्रवादीची वाट धरली आहे. त्यांना राष्ट्रवादीने माळशिरस मधून उमेदवारी जाहीर केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना, भाजप , बंडखोर भाजप नेते , पुन्हा भाजप आणि आता राष्ट्रवादी कॉंग्रेस असा मोठा पक्षांतराचा प्रवास जानकरांच्या नावावर आहे. भाजपाने त्यांना फलटणची उमेदवारी दिली होती.
गेली चाळीस वर्ष जिल्ह्याच्या राजकारणावर मजबूत पकड असणारे मोहिते पाटील कुटुंब गेली दहा वर्ष झाले सत्तेतून बाहेर फेकले गेले होते. मात्र पक्षाकडून कोणतीच अपेक्षा न ठेवता लोकसभेला भाजप प्रवेश करुन त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून आणले. आणि जिल्ह्याच्या राजकारणावर आपली पकड मजबूत केली. त्याच्याच प्रत्यय माढा आणि माळशिरस मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवारी वरुन दिसून आलाय. माळशिरस मोहिते पाटलांचे होमग्राउंड आहे मात्र माढ्यात भाजप युतीचा उमेदवार निवडून आणने एक मोठे आव्हान असणार आहे हे देखिल वास्तव नाकारून चालणार नाही.

error: Content is protected !!