कॉंग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे आणि आमदार भारत भालकेंमध्ये का पडली “दरार” ? वाचा सविस्तर

पंढरपूर :- राज्यात विधानसभा निवडणूकीच्या रणधुमाळीला सुरवात झाली आहे. बलाढ्य महायुतीला टक्कर देण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांनी कंबर कसली आहे. कॉंग्रेस आघाडीला एक एक जागा महत्वाची असताना पंढरपूर मतदारसंघात मात्र आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसत आहे. निवडणूकीच्या तोंडावर कॉंग्रेस सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले आमदार भारत भालकेंच्या विरोधात कॉंग्रेसने उमेदवार दिला आहे. दहा वर्ष कॉंग्रेसची कास धरणारे आमदार भारत भालकेंचे आणि जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यामध्ये चांगले सख्ख्य होते. मात्र अशी कोणती ठिणगी या दोघांमध्ये दरार पाडण्यास कारणीभूत ठरली. वाचा सविस्तर
पवार प्रेम!
आमदार भारत भालके हे आपल्या राजकारणाच्या बाराखडी पासून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार प्रेमी आहेत. पवारांनी आपल्याला राजकारणाच्या प्रत्येक पावलावर सहकार्य केल्याने भालके प्रत्येक विचारपीठावर सांगतात. २००९ साली माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटलांचा धक्कादायक पराभव केल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवडून आलेले भालके कॉंग्रेसचे सहयोगी सदस्य झाले. २०१४ साली त्यांनी कॉंग्रेस प्रवेश केला आणि पंजावर निवडणूक लढली. कॉंग्रेसमध्ये थेट प्रवेश करुन देखिल त्यांनी आपले पवार प्रेम तसूभरही कमी होवू दिले नाही. तात्कालीन केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी भालकेंना जिल्ह्याच्या राजकारणात झुकते माप दिले, जवळ करण्याचा प्रयत्न केला. मात्र तेल लावलेला पैलवान म्हणून ओळख असणारे भालके शिंदेंच्या हाती लागकेच नाहीत. आपली पवार प्रेमी प्रतिमा त्यांनी कधीच पुसू दिली नाही. त्यामुळेच ते कॉंग्रेस नेत्यांच्या डोळ्यावर आले होते.
पंढरपूर विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसचे शिंदे-भालके गट कार्यरत.
२०१४ च्या लोकसभेत दारून पराभव झाल्यानंतर सुशीलकुमार शिंदे काहीकाळ जिल्ह्याच्या राजकारणापासून दूर राहिले. मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणूकांपुर्वी ते सक्रिय झाले. पंढरपूर विधानसभा मतदारसंघ त्यांच्या लोकसभा मतदारसंघात येत असल्याने त्यांचे आमदार भालकेंवर विशेष लक्ष होते. याच काळात भालकेंनी कॉंग्रेस सोडण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे कॉंग्रेस मध्ये शिंदे-भालके असे उघडपणे दोन गट पडल्याचे चित्र होते. सरकार विरोधी आंदोलन असो वा पक्षांर्तगत कार्यक्रम हे दोन गट कायम एकमेकांना पाण्यात बघत असत. “सोलापूर डेली” या गटबाजीवर वेळोवेळी वार्तांकन केले आहे. आज तोच शिंदे गट भालकेंची डोकेदुखी ठरलाय.

लोकसभा निवडणूकीत सुशीलकुमार शिंदेंशी विसंवाद नडला.
आपण निवडणूक लढणार नाही म्हणत म्हणत शिंदे मैदानात उतरले. माझी ही शेवटची सार्वजनिक निवडणूक म्हणून त्यांनी मतदारांना भावनिक साद घातली. पंढरपूर मतदारसंघाची जबाबदारी आमदार भालकेंवर होती. मात्र प्रचाराच्या काळात भालकेंनी कॉंग्रेस आणि शिंदेंशी विसंवाद कायम ठेवला. कॉंग्रेसच्या प्रचार यंत्रणे सोबत न राहता त्यांनी विठ्ठल परिवाराच्या माध्यमातून आपली स्वतंत्र प्रचार यंत्रणा उभारली. यातून शिंदे आणि भालके यांच्यामध्ये शीतयुद्ध रंगले असल्याची चर्चा देखिल होती.
१२ एप्रिल २०१९ “ती” प्रचार रॅली.
सोलापूर लोकसभा निवडणूक प्रचारार्थ सुशीलकुमार शिंदेंनी पंढरपूर शहरात १२ एप्रिल रोजी भव्य रॅलीचे आयोजन केले होते. कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील आणि शहराध्यक्ष राजेश भादुले यांनी या रॅलीचे नेटके नियोजन केले होते. सकाळी लवकरच शिंदे पंढरीत दाखल झाले होते. रॅलीला सुरवात झाली. मात्र कॉंग्रेसचे विद्यमान आमदार भारत भालके अथवा त्यांचे समर्थक या रॅलीत कोठेच दिसत नव्हते. पहिली ठिणगी याच रॅलीत पडली. भालकेंची अनुपस्थिती चर्चेचा विषय बनली होती. पत्रकारांनी देखिल शिंदेंकडे याबद्दल विचारणा केली. आमदार भालके हे आपल्या बंगल्यावरच होते मात्र रॅलीत सहभागी झाले नाहीत. ही बाब कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या निदर्शनास आणून दिली. शिंदेंनी संपर्क साधून देखिल भालके अखेर पर्यंत रॅलीत सामिल झाले नाहीत. २०१४ च्या पराभवामुळे ताक ही फुकुन पिणाऱ्या शिंदेंनी रॅली आटोपती घेवून थेट भालकेंचा बंगला गाठला आणि त्यांची मनधरणी केली. भालकेंच्या अडचणी, आक्षेप जाणून घेतल्या. आणि मतदारसंघाची संपूर्ण प्रचार यंत्रणा भालकेंच्या ताब्यात दिली. यावर भालके त्याच दिवशीच्या शिवतिर्थावरील सभेत सहभागी झाले. अखेर शिंदेंचा पराभव झाला. अशा कठीण परिस्थितीत आपल्याला त्रास देणार्यांना विसरतील ते शिंदे कसले? भालकेंनी आपल्याला घाटात पकडल्याची भावना शिंदेंची १२ एप्रिल रोजीच झाली होती. अखेर विधानसभेला कॉंग्रेसचा उमेदवार देवून शिंदेंनी त्याच घाटात भालकेंना गाठल्याची चर्चा सध्या मतदारसंघात सुरु आहे. यामध्ये कहर म्हणून शिंदेंची कन्या आमदार प्रणितीताईंच्या विरोधात राष्ट्रवादीने उमेदवार दिला आहे. पित्याला त्रास दिल्यानंतर कन्येकडे मोर्चा वळाला आहे?

भाजपा प्रवेश फसल्यानंतर कॉंग्रेस श्रेष्ठींचा भालकेंना संपर्क!
निवडणूकीच्या आगोदर आषाढी यात्रेपासून भालके भाजपात प्रवेश करणार अशी चर्चा होती. या चर्चेला भालकेंनी कधीच नकार दिला नाही . मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी वाढलेली जवळीक सर्वकाही सांगून जात होती. भाजपा प्रवेशासाठी भालकेंनी अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. मात्र परिचारक विरोधामुळे त्यांचा भाजपा प्रवेश झाला नसल्याचे बोलले जाते. दरम्यान भालकेंचा भाजप प्रवेश फसल्याचे कळाल्यावर कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी भालकेंना स्वगृही राहण्यासाठी गळ घातली. अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदेंनी भालकेंना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असल्याचे एका कॉंग्रेस पदाधिकाऱ्याने सांगितले. मात्र भालकेंनी कोणालाही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे कॉंग्रेस नेते भालकेंवर चिडून असल्याची चर्चा आहे. अशामध्येच जिल्ह्याचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदेंनी देखिल भालकेंच्या त्रासामुळे आपला “हात” काढून घेतला.
या सर्व घटना पहाता आजच्या परिस्थितीला खुद्द आमदार भालकेचं जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. गत दहा वर्षात भालकेंनी पंढरपूर मतदारसंघात घराघरात हाताचा पंजा पोहचवला आहे. कॉंग्रेसने आपला उमेदवार माघार न घेतल्यास तोच “हात” भालकेंचा मोठा अडसर ठरणार हे नक्की. वरील परिस्थितीत भालके विरोधी उमेदवाराचे पारडे सध्या जड दिसत आहे.

error: Content is protected !!