शिवाजी काळुंगेंचा झटका. प्रदेश कॉंग्रेसच्या आदेशाला केराची टोपली दाखवत निवडणूकीच्या रिंगणात .

कॉंग्रेसचा हात भालकेंचा घात?
पंढरपूर:- पंढरपूर विधानसभेसाठी अर्ज भरल्यापासून चर्चेत असलेले कॉंग्रेसचे उमेदवार शिवाजी काळुंगे यांनी अखेर पक्षादेश झुगारत आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. पंढरपूर मतदारसंघात २० उमेदवार मैदानात उतरले आहेत. कॉंग्रेसच्या निवडणूक चिन्हामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार भारत भालकेंच्या अडचणी वाढल्या आहेत. पंढरपूर मतदारसंघात महायुतीचे सुधाकरपंत परिचारक, राष्ट्रवादीचे भारत भालके आणि अपक्ष समाधान आवताडे अशी तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कॉंग्रेसचे विद्यमान आमदार भारत भालकेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाने कॉंग्रेसने मतदारसंघावर हक्क सांगत काळुंगेंना उमेदवारी जाहीर केली. त्यांना पक्षाचा ए आणि बी फॉर्म देखिल दिला. काळुंगेंच्या उमेदवारीने आपला उमेदवार अडचणीत येतोय हे लक्षात येताच राष्ट्रवादीने शहर मध्य मधून उमेदवारी अर्ज दाखल केला. आज अर्ज माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी राष्ट्रवादीच्या उमेदवाराने आपली अर्ज काढून घेतला. मात्र काळुंगेंना प्रदेश कॉंग्रेसने लेखी आदेश देवून सुद्धा त्यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे.
पंढरपूरचे विद्यमान आमदार भारत भालके हे कॉंग्रेस मध्ये असताना जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि लोकसभा निवडणूकीत कॉंग्रेसचा प्रचार केला होता. त्यामुळे कॉंग्रेसचे निवडणूक चिन्ह हाताचा पंजा हे घराघरात पोहचले आहे. याचा विधानसभा निवडणूकीत फटका बसण्याची भीती भालके समर्थकांना आता वाटु लागली आहे. काळुंगें पेक्षा त्यांचे निवडणूक चिन्ह भालकेंसाठी धोक्याची घंटा ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सेना बंडखोर शैला गोडसेंनी आपली उमेदवारी माघार घेतल्याने महायुतीचे उमेदवार सुधाकरपंत परिचारकांना दिलासा मिळाला आहे तर कॉंग्रेसच्या उमेदवारीने आघाडीचे उमेदवार भालकेंच्या अडचणीत वाढ झाली आहे.

error: Content is protected !!