मंगळवेढा एम आय डी सी भारता बाहेर आहे का? पंढरपूर मतदारसंघातील बेरोजगार मतदारांचा “भावी आमदारांना” सवाल.

पंढरपूर :- निवडणूकांचा काळ म्हणजे मतदारांना मुर्ख बनवण्याची जणू स्पर्धाच उमेदवारांमध्ये सुरु असते. गत पाच वर्षात कोणी काय केले? हे न सांगता पुढील पाच वर्षात काय करु ही स्वप्न दाखवण्याची चढाओढ सुरु असते. असाच काहीसा प्रकार पंढरपूर मतदारसंघात सुरु आहे. मतदारसंघात एम आय डी सी ला कोणी विरोध केला हे घसा कोरडा पडे पर्यंत सांगितले जात आहे. मात्र मतदारसंघात असणाऱ्या मंगळवेढा एम आय डी सी च्या विकासाकडे कोणत्याच “भावी आमदाराचे” लक्ष नसल्याचे दिसत आहे.मंगळवेढा भारता बाहेर आहे का ? असा सवाल येथिल बेरोजगार मतदार विचारत आहे.
२००९ साली मतदारसंघ पुर्नरचनेत मंगळवेढा तालुक्यासह पंढरपूर शहर, ग्रामीण भागांचा मिळून पंढरपूर विधानसभा मतदारसंघ तयार झाला. २००९ च्या त्या पहिल्याच निवडणूकीत विद्यमान आमदार भारत भालकेंनी मतदारसंघात एम आय डी सी बाबत जोरदार प्रचार केला. पंढरपूर मध्ये एम आय डी सी नसल्याबद्दल तात्कालीन आमदार सुधाकरपंत परिचारकांवर टीका केली. तसेच प्रतिस्पर्धी उमेदवार माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटलांवर देखिल त्यांनी एम आय डी सी बद्दल खडे बोल सुनावले. पुण्यातील औद्योगिक क्षेत्राप्रमाणे मतदारसंघात औद्योगिक क्षेत्र उभारु आणि युवकांच्या हाताला काम देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. आमदार भालके निवडणूक आले. त्यानंतर तालुक्यात एम आय डी सी उभारण्यावरुन अनेक कलगीतुरे रंगले.
२०१४ च्या विधानसभा निवडणूकीत देखिल आमदार भारत भालके आणि महायुतीच्या उमेदवारांनी तालुक्यात एम आय डी सी बद्दल आश्वासनाचे झेंडे रोवले. तालुक्यातील भाळवणी येथे प्रस्तावित औद्योगिक क्षेत्राला कोणी विरोध केला याचे कवित्व २०१९ च्या निवडणूकीत देखिल सुरु आहे.
२०१९ च्या निवडणूकीत पुन्हा तालुक्याचे पारंपरिक प्रतिस्पर्धी भालके आणि परिचारक आमने सामने आले आहेत. पंढरपूर तालुक्यात एम आय डी सी? हा तालुका मर्यादित विषय घेवून दोन्ही उमेदवारांचे आरोपप्रत्यारोप सुरु आहेत. मात्र मतदारसंघाचा विचार केल्यास पंढरपूर पासून हाकेच्या अंतरावर मंगळवेढा एम आय डी सी वसली आहे. संपूर्ण मंगळवेढा तालुका पंढरपूर मतदारसंघात समाविष्ट आहे. कायम दुष्काळी तालुका असल्याने नवे उद्योग उभारुन तालुक्यातील तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी तब्बल ९५ हेक्टर क्षेत्रावर हे औद्योगिक क्षेत्र उभे आहे. याच्या विकासाकडे मात्र कोणाचेही लक्ष नसल्याचे दिसत आहे. ९५ हेक्टर क्षेत्रात अवघे ५ ते ६ उद्योग उभे आहेत. या क्षेत्रात उद्योगासाठी लागणाऱ्या मूलभूत सुविधांची कमालीची वानवा आहे. पाणी, रस्ते , सुरक्षेच्या उपायोजना नाहीत. संपूर्ण क्षेत्र वाटप झाले आहे. मात्र काहींनी फक्त जागा घेवून ठेवल्याने नव्याने उद्योग उभारण्याची अपेक्षा ठेवणार्यांना जागा मिळत नाहीत. तर सुविधा नसल्याने काही उद्योजक उद्योग उभारण्यास तयार नाहीत.
विजापूर-टेंभुर्णी रस्त्याचे चौपदरीकरण जवळपास पुर्ण होत आले आहे. या महामार्गावरच हे औद्योगिक क्षेत्र वसले आहे. चौपदरीकरणामुळे पुणे, मुंबई, हैदराबाद, बंगळूर आदी मोठी शहरांचे दळणवळण सोपे झाले आहे.
निवडणूकी मध्ये एम आय डी सी बद्दल बोलून घसा कोरडा करण्यापेक्षा मंगळवेढ्याच्या एम आय डी सी च्या विकासाकडे लक्ष दिल्यास मतदारसंघातील बेरोजगारीचा प्रश्न बऱ्यापैकी मिटेल असे मत आता युवक वर्गातुन व्यक्त होत आहे. आज पंढरपूर-मंगळवेढ्यातील अनेक तरुण आपले घरदार सोडून रोजगारासाठी पुणे, मुंबईला जात आहेत. त्यांच्या हाताला गावातच काम मिळाल्यास त्यांची ओढाताण नक्कीच वाचणार आहे.
आता सध्या निवडणूकीला उभे असलेल्या उमेदवारांचा विचार करुयात.
मतदारसंघ पुर्नरचनेनंतर पहिले आमदार झाले ते भारत भालके. स्वाभिमानी शेतकरी संघटनने कडून निवडून आले तरी त्यांनी कॉंग्रेसला पाठिंबा दिला होता. २००९ ते २०१४ राज्यात कॉंग्रेसचे सरकार होते. त्यांनी या औद्योगिक क्षेत्राचा विकास करण्याची मोठी संधी होती. मात्र ते ही अडकले तालुक्याच्या प्रेमात. २०१४ च्या निवडणूकीत पुन्हा आमदार भालके उभे राहिले. त्यांच्या विरोधात महायुतीचे आमदार प्रशांत परिचारक मैदानात उतरले. भालके आमदार झाले. परिचारकांना पराभव स्विकारावा लागला. मात्र काही दिवासातच प्रशांत परिचारक विधानपरिषदेवर निवडून गेले. यावेळी आमदार परिचारकांना संधी होती. कारण सरकार भाजपचे आणि परिचारक मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय. त्यांनी मंगळवेढ्यात एक खासगी साखर कारखाना उभा केला. मात्र औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी संधी गमावली. आमदार भालके आणि आमदार परिचारक पंढरपूर तालुक्यातील असल्याने त्यांचे तालुका प्रेम समजू शकतो. मात्र उद्योगपती म्हणून राजकारणात आलेले समाधान आवताडे देखिल मुख्यमंत्री फडणवीसांच्या गटातील म्हणून ओळखले जातात. त्यांनी भाजप सत्तेचा उपयोग दामाजी कारखान्यासाठी करुन घेतला मात्र औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी काहीच केले नसल्याचा आरोप त्यांच्यावर केला जातो. कॉंग्रेस बंडखोर शिवाजी काळुंगे ४० वर्ष कॉंग्रेसचे एकनिष्ठ असल्याचे सांगतात. पण कॉंग्रेसच्या सत्ताकाळात त्यांनी देखिल कोणतेच सकारात्मक पाउल उचलले नाही. आवताडे आणि काळुंगे हे मंगळवेढ्याचे भूमिपुत्र म्हणून मैदानात आहेत. ते देखिल फक्त आश्वासन देण्याशिवाय काहीच आश्वासक करताना दिसत नाहीत.
भालके, परिचारक, आवताडे आणि काळुंगे यांच्यामध्ये चौरंगी सामना या निवडणूकीत रंगला आहे.
एकंदरीतच “विकास” फक्त निवडणूकांपुरतचं असतो. त्याचे पुढचे पाच वर्ष काहीच काम नसते अशी भावना आता बेरोजगार तरुणांची होताना दिसत आहे.

error: Content is protected !!