Home पंढरपूर कोंडी फोडण्यासाठी खडीक्रशर आणि खाणमालकांची पंढरपुरात गुप्त बैठक.

कोंडी फोडण्यासाठी खडीक्रशर आणि खाणमालकांची पंढरपुरात गुप्त बैठक.

89
0

पंढरपूर :- गेल्या महिनाभरापासून सोलापूर जिल्ह्यातील खडी क्रशर आणि उत्खनन बंद आहे. राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध प्रकारच्या परवानग्या नसल्याने महसूल प्रशासनाने कारवाई करून सदरचे बेकायदेशीर खडीक्रशर सील केले आहेत. शासनाच्या या कारवाईने हतबल झालेल्या खडी क्रशर आणि खाणमालकांची नुकतीच गुप्त बैठक पंढरपुरात झाल्याची चर्चा आहे.


महिन्याभरापासून आपला व्यवसाय बंद पडल्याने ही कोंडी फोडण्यासाठी खडी क्रशर आणि खाणमालक एकवटले आहेत. तालुका पातळीपासून मंत्रालयापर्यंत हेलपाटे मारून सुद्धा ही कोंडी फुटली नाही. त्यामुळे हातबल झालेल्या खडी क्रशर आणि खाणमालकांनी बैठक घेतली. या बैठकीत “अर्थ”पूर्ण चर्चा करत आपला बंद पडलेला व्यवसाय सुरू करण्याची चाचपाणी केल्याचे समजते.
या काळ्या सोन्याच्या धंद्यामध्ये सर्वपक्षीय नेत्यांचा सहभाग आहे. त्यामुळे आपापल्या गॉडफादर मार्फत देखील हे सील काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
मात्र यामध्ये केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाची परवानगी मुख्य आहे. पर्यावरण खात्याची परवानगी नसल्यानेच हे खडी क्रशर सील केले आहेत. ही परवानगी नसताना देखील पुन्हा खडी क्रशर सुरू करण्याचा अट्टाहास खडीक्रशर मालकांचा आहे. त्यामुळे आता प्रशासन हे बेकायदेशीर खडीक्रशर चालू करण्यास परवानगी देणार का? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.