Home क्राईम घंटा गाडीत सापडले तीन महिन्याचे मृत अर्भक

घंटा गाडीत सापडले तीन महिन्याचे मृत अर्भक

642
0

पंढरपूर :- शहरात कचरा गोळा करणाऱ्या घंटा गाडीमध्ये अज्ञात व्यक्तीने पुरुष जातीचे तीन महिन्याचे मयत बाळ एका प्लास्टिकच्या पिशवीत टाकून दिल्याची घटना रविवारी उघड झाली आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहीतीनुसार,  गुरुदास दादा गाडे (वय २६, रा. आंबेडकर नगर, पंढरपूर) यांनी एम एच – १३ सी यू ८९४३ या क्रमांकाच्या घंटा गाडीतुन रविवारी सकाळी सहाच्या सुमारास संभाजी चौक येथुन कचरा गोळा करण्यास सुरुवात केली. तेथुन ते पुढे डगरीवर, दर्शन मंडप बोळ, उत्पात गल्ली, बडवे गल्ली, इंदीरा गांधी भाजी मंडई बोळ, बेलीचा महादेव रोड, व तानाजी चौक येथील कचरा गाडीत गोळा केला.
ती कचराने भरलेली गाडी सरळ कोठेही न थांबता नगरपालिका कचरा डेपो क्रं १००, जुना कासेगाव रोड, पंढरपुर येथे घेऊन आले. त्यानंतर गाडीतील कचऱ्यातील एका प्लॅस्टीक पिशवीतुन एक मयत नवजात भ्रूण (अंदाजे वय ३ महिने) हे खाली पडल्याचे त्याठिकाणी नगरपालिकेच्या कचरा वेगळा करणाऱ्या कर्मचारी संगिता तुकाराम पोरे (वय ४५, रा. रमाई नगर, सांगोला नाका, पंढरपूर) यांना दिसले. त्यांनी हा प्रकार लगेच तेथे काम करणारे सफाई कर्मचारी संतोष सर्वगोड यांना सांगितला. त्यांनी याबाबत तात्काळ पोलीसांना माहीती दिली. घटनास्थळी पोलीसांनी भेट दिली. कोणीतरी अज्ञात इसमाने त्या भ्रूणाची  बेकायदेशीर विल्हेवाट लावण्याकरीता, अपत्य जन्माची लपवणुक करण्याकरीता टाकुन दिले असल्याबाबत तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.