Home पंढरपूर अश्विनी हॉस्पिटलमधील १३३ जणांवर गुन्हे दाखल.

अश्विनी हॉस्पिटलमधील १३३ जणांवर गुन्हे दाखल.

882
0

सोलापूर:- कोरोना संसर्गाच्या कालावधीत रुग्ण सेवा न देणार्या अश्विनी हॉस्पिटल मधील 133 वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि इतर सेवकांवर आज गुन्हा दाखल करण्यात आला. कोविड हॉस्पिटलसाठी नियुक्त सनियंत्रण अधिकारी धनराज पांडे यांनी ही माहिती दिली. कोरोना संसर्गामध्ये रुग्णालयात उपस्थित राहून रुग्णसेवा न देता गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदामधील कलम 188, 51 b,57 ,269, 336 यानुसार सदर बझार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे श्री. पांडे यांनी सांगितले.

कोरोना संसर्गात खासगी दवाखाने बंद राहिल्याने रुग्णांना सेवा मिळाली नाही. त्यामुळे सिव्हील हॉस्पिटलवरही ताण आला होता. दरम्यान यशोधरा हॉस्पिटल, सिद्धेश्वर स्पेशालिटी हॉस्पिटल, चिडगुपकर हॉस्पिटल आणि धनराज गिरजी हॉस्पिटल खास कोविड रुग्णांवर उपचारासाठी घोषित करण्यात आली आहेत. मात्र या हॉस्पिटलमध्ये काही डॉक्टर, अधिकारी, कर्मचारी, सेवक गैरहजर असल्याचे निदर्शनास आले आहे. हे जर उद्या, रविवारी दुपारी बारा वाजेपर्यंत हजर राहिले नाही तर त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येईल, असे पांडे यांनी सांगितले. कोविड रुग्णांवर उपचारासाठी जाहीर करण्यात आलेल्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांना दाखल करून घेतले पाहिजे. कोणत्याही हॉस्पिटलमध्ये रुग्णांना दाखल करून घेण्यात हयगय करु नये, काही समस्या असल्यास त्या प्रशासनाकडून सोडविण्यात येतील, असेही पांडे यांनी सांगितले.