Home पंढरपूर अमानवी घटना ……. हलगी वाजवून संसाराचा गाडा चालविणाऱ्या कोरोना रुग्णास बिलासाठी...

अमानवी घटना ……. हलगी वाजवून संसाराचा गाडा चालविणाऱ्या कोरोना रुग्णास बिलासाठी ठेवले डांबून.

939
0

सोलापूरच्या कुंभारी मधील अश्विनी रुग्णालयाचा प्रताप.

पंढरपूर :- पंढरपूर तालुक्यातील बार्डी येथिल कोरोना बाधिताला कोरोना मुक्त झाल्यानंतर बिलासाठी डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. सोलापूरच्या कुंभारी येथिल अश्विनी रुग्णालयाने ३२ हजार ८०० रुपयांच्या बिलासाठी दोन दिवस झाले रुग्णाला घरी सोडले नाही. कोरोना महामारीत गोरगरीब रुग्णांना लुटणाऱ्या रुग्णालयांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मनसेचे राज्य सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी पंढरपूरचे आमदार भारत भालके, प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसीलदार वैशाली वाघमारे यांच्याकडे केलीय.
बार्डी येथिल एका व्यक्तीचा क्वारंटाईन असताना १ जूनला कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर तातडीने त्याला करकंब ग्रामीण रुग्णालयामार्फत सोलापूरला पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले. तेथून त्यांना कुंभारी अश्विनी रुग्णालयात उपचारासाठी ठेवले होते. उपचारादरम्यान हा रुग्ण बरा झाला. परंतु रुग्णालयाने उपचाराचे ३२ हजार ८०० रुपये भरा मगच रुग्णाला घरी सोडू अशी भुमिका घेतली. हलगी वाजवून संसाराचा गाडा हाकणार्या या कुटुंबाला ही बिलाची रक्कम ऐकून धक्काच बसला. कोरोनातुन मुक्ती मिळाली पण या कसायांच्या तावडीतून काय सुटका होईना.
या रुग्णाच्या कुटूंबांनी अखेर आमदार भारत भालके, मनसेचे सरचिटणीस दिलीप धोत्रेंशी संपर्क साधला. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या रुग्णाला सोडण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. रुग्णाला बिल न भरण्याबाबत पंढरपूरच्या प्रशासनाने सूचना दिल्या आहेत. कोरोना रुग्णाच्या उपचाराचे शासनाकडून जमा होणारे बिल न आल्याने हा प्रश्न निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. तरीही अद्याप त्या रुग्णाला सोडण्यात आले नाही.