Home पंढरपूर प्रशासनाला थेट आव्हान ; व्हाट्सअप वर स्टेटस ठेवून भीमा नदीत वाळू उपसा...

प्रशासनाला थेट आव्हान ; व्हाट्सअप वर स्टेटस ठेवून भीमा नदीत वाळू उपसा सुरू

638
0

पंढरपूर :- श्री विठ्ठलाच्या पदस्पर्शाने आणि भक्त पुंडलिकाच्या वास्तव्याने पावन झालेल्या भीमा नदीला पवित्र मानलं जातं. जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा असे वर्णन संतांनी आपल्या अभंगातून करून ठेवले आहे. मात्र वाळू तस्करीमुळे चंद्रभागेचं पावित्र्य धोक्यात आलंय. प्रशासनाने अतोनात प्रयत्न करून सुद्धा वाळू तस्करी कमी झाली नाही. आता तर एका पठ्ठ्याने चक्क व्हाट्सअप ला स्टेटस ठेवून वाळू उपसा सुरू केल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. या फोटोमध्ये यंत्राच्या साहाय्याने वाळू उपसा सुरू असल्याचे स्पष्ट दिसत आहे.


पंढरपुरातील पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन आपापल्या परीने वाळू उपसा रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र या शासकीय यंत्रणांमधीलच काही लोकांमुळे वाळू तस्करांना अभय मिळत असल्याचे दिसत आहे. पंढरपूर तालुक्याच्या आंबे सरकोली सुस्ते तारापूर शिरढोण भटुंबरे गोपाळपूर या भिमेच्या काठी मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे. पोलिसांनी वाळू उपशावर कारवाई करून वाळू तस्करांवर तडीपारीची कारवाई देखील केली आहे. तरीसुद्धा या टोळीतील राहिलेले सदस्य वाळू उपसा पुढे चालू ठेवत आहेत.
नदीकाठच्या एका वाळू तस्कराने चक्क आपल्या व्हाट्सअप स्टेटस ला वाळू उपसा चा फोटो ठेवला आहे. वाळू तस्कराच्या धाडसाने या तस्करांवर कोणाचाच अंकुश राहिला नसल्याची चिंताजनक बाब पुढे आली आहे. व्हाट्सअप ला स्टेटस ठेवून या पठ्ठ्याने थेट प्रशासनालाच आव्हान दिलं आहे. जो उखाडना हैं वो उखाडलो असा संदेशच या पठ्ठ्याने दिला असल्याची चर्चा पंढरपूर तालुक्यात सुरू आहे. या तस्कराच्या टोळीच्या सदस्यावर काही दिवसांपूर्वी गुन्हा देखील दाखल झाल्याचे समजते. आपला टोळीप्रमुख तुरुंगात असताना देखील आपला वाळू उपसा सुरूच आहे हेच या व्हाट्सअप स्टेटस वरून दाखवण्याचा प्रयत्न झाला असल्याची चर्चा सुरू आहे.
पंढरपूर तालुक्यात सध्या अवैध खडी क्रशर, मुरूम उत्खनन आणि वाळू तस्करी ची कीड लागली आहे. मागील आठवड्यात एका मंडल अधिकाऱ्यावर अँटी करप्शन ची कारवाई देखील झाली.