पंढरपूर :- सात वर्षाच्या कृष्णा धोत्रेचा मृतदेह सोमवारी मध्यरात्री बंद अवस्थेत असलेल्या शौचालयात छिन्नविच्छिन्न अवस्थेत सापडला होता. घटनेला सहा दिवस उलटले तरी कृष्णाच्या मृत्यूचे गुढ कायम आहे. त्यामुळे कृष्णाच्या परिवाराचा आक्रोश सुरू आहे तर दुसरीकडे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. आज शुक्रवारी राष्ट्रवादीचे नेते भगीरथ दादा भालके, मनसेचे नेते दिलीप धोत्रे, माजी विरोधी पक्षनेते सुधीर धोत्रे, वडार समाजाचे नेते लक्ष्मण बंदपट्टे, नगरसेवक लखन चौगुले, नगरसेवक महादेव धोत्रे, शिवसेना शिंदे गटाचे संजय बंदपट्टे, मी वडार महाराष्ट्राचे जिल्हाध्यक्ष दत्ता भोसले, सचिन बंदपट्टे, विठ्ठल बंदपट्टे आदी समाज बांधवांनी कृष्णाच्या कुटुंबाची भेट घेतली.
आमच्या मुलाची हत्या झाली आहे. या घटनेची सखोल चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी कृष्णाच्या कुटुंबीयांनी केली. रविवारी नातेवाईकाच्या घरून जेवण करून येत असताना कृष्णा अचानक गायब झाला. सोमवारी मध्यरात्री घराजवळच्याच बंद अवस्थेत असलेल्या शौचालयात त्याचा मृतदेह आढळून आला. भर लोकवस्तीत घडलेल्या या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या भागात प्रत्येक कुटुंबामध्ये एक लहान मुल आहे. अशा परिवारात आपल्या लहान मुलांबद्दल काळजी व्यक्त केली जात आहे. कृष्णाचा घात झाला की अपघात होता याची तात्काळ चौकशी करण्याची मागणी देखील आता या भागातील नागरिकांच्या वतीने केली जात आहे.
कृष्णाच्या पोस्टमार्टम मृत्यूचे गुढ उकलण्याची शक्यता आहे. त्यामुळे
पोस्टमार्टम अहवाल येईपर्यंत आम्ही वाट पाहू अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कृष्णाच्या कुटुंबीयांनी आणि समाज बांधवांनी दिला आहे.