Home पंढरपूर पार्किंग फी च्या नावाखाली बोगस पावत्या देऊन पंढरीत भाविकांची लूट ; नगरपालिकेचे...

पार्किंग फी च्या नावाखाली बोगस पावत्या देऊन पंढरीत भाविकांची लूट ; नगरपालिकेचे दुर्लक्ष

1008
0

पंढरपूर :- कार्तिकी एकादशीच्या सोहळ्याला राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक पंढरपुरात दाखल झालेले आहेत. मात्र याच भाविकांची भर रस्त्यात दिवसाढवळ्या आर्थिक लूट होत असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. पार्किंग फी च्या नावाखाली पंढरपूर नगरपालिकेच्या नावाने प्रत्येक वाहना कडून पैसे वसूल केले जात आहेत. पंढरपूर नगरपालिकेने पार्किंग वसुलीचा ठेका अद्याप कुणालाही दिलेला नाही. नगरपालिकेचे फक्त सहा कर्मचारी अधिकृतरित्या ही फी वसूल करीत आहेत. मात्र काही समाजकंटकांनी नगरपालिकेच्या नावाने बोगस पावती पुस्तक छापून भाविकांची लूट सुरू केली.

भारताची दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणाऱ्या पंढरपूरला वर्षाकाठी एक कोटीच्या वर भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी येत असतात. खाजगी वाहनाने येणाऱ्या भाविकांना पंढरपूर नगरपालिकेने स्वच्छता व पार्किंग कर सुरू केला. गेले काही वर्ष खाजगी ठेकेदाराद्वारे ही वसुली केली जायची. मात्र कोणताही अधिकृत ठेकेदार नेमला नाही. त्यामुळे नगरपालिका आपल्या सहा अधिकृत कर्मचाऱ्यांच्याद्वारे पार्किंग फीची वसुली करत आहे.

मात्र याच दरम्यान ऐन यात्रा कालावधीमध्ये काही समाजकंटकांनी बोगस पावती पुस्तक छापून भाविकांची लूट सुरू केली आहे. हे समाजकंटक भाविकांकडून एका वाहनाचे 24 तासासाठी 50 ते 200 रुपये वसूल करत आहेत. जो भाविक चार दिवस राहणार आहे. त्याचे कडून एकदमच चार दिवसांची फी वसुली केली जात आहे.
मोकळ्या मैदानामध्ये, नगरपालिकेच्या अधिकृत पार्किंग लॉट मध्ये ही लूट उघडपणे सुरू आहे. अशा लुटीच्या अनेक तक्रारी पंढरपूर नगरपालिकेकडे भाविकांनी केले आहेत. मात्र नगरपालिका कारवाई करताना दिसत नाही. त्यामुळे ही बोगस वसुली करणाऱ्यांवर नगरपालिकेचा वरदहस्त आहे का? अशी चर्चा भाविकांमधून व्यक्त होत आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते कार्तिकी एकादशीची महापूजा पार पडणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपूर मुक्कामी आहेत. यादरम्यान काही वारकरी संघटना सदरच्या प्रकाराबद्दल गृहमंत्र्यांना निवेदन देऊन कडक कारवाईची मागणी करणार असल्याचे समजते.

पावती पुस्तक छापून देणाऱ्या प्रिंटर वर कारवाई करण्याची भाविकांची मागणी….
पंढरपूर नगरपालिकेच्या नावाने अशा बोगस पावत्या फाडून भाविकांची आर्थिक लूट करणाऱ्या समाजकंटकांसोबत सदरचे पावती पुस्तक छापून देणाऱ्या प्रिंटर वर देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी भाविकातून होत आहे.

पोलिसांवर जबाबदारी ढकलून नगरपालिकेने हात झटकले.
अशा प्रकारच्या तक्रारी आल्यानंतर नगरपालिकेने पंढरपूर शहर पोलीस स्टेशनला कारवाईचे मागणी करणारे पत्र देऊन आपले हात झटकले आहेत.