पंढरपूर :- पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचे आमदार भारत नाना भालके यांच्या अकाली निधनाने रिक्त झालेल्या जागेची पोटनिवडणूक 17 एप्रिल रोजी होत आहे. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीकडून उमेदवारी बद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र दोन दिवसांपूर्वी निवडणूक जाहीर होतात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ दादा भालके यांचे नाव मागे पडली असून स्वर्गीय भारत नाना भालके यांच्या सुविद्य पत्नी जयश्रीताई भालके यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली.
श्रीमती जयश्री ताई भालके यांना राष्ट्रवादीने उमेदवारी देऊन स्वर्गीय भारत नाना भालके यांच्या अकाली निधनाची सहानभूती मिळवण्याचा राष्ट्रवादीकडून प्रयत्न केला जातोय.
आमदार भारत नाना भालके यांचे सुपुत्र भगीरथ दादा भालके यांचे नाव उमेदवारीसाठी पुढे येऊ लागल्याने भाजप कडून देखील तगडा उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तर युवा उद्योजक समाधान दादा अवताडे यांनी देखील मतदारसंघ पिंजून काढला आहे. हीच ती वेळ म्हणून समाधान आवताडे तयारीला लागल्याचे चित्र दिसत आहे.
भगीरथ भालके यांना उमेदवारी दिल्यास अटीतटीची लढत होऊ शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात असल्याने राष्ट्रवादीने हुकमी एक्का बाहेर काढत जयश्रीताई भालके यांची उमेदवारी जवळपास निश्चित केल्याचे समजते. जयश्रीताई भालके यांना उमेदवारी दिल्यानंतर ही निवडणूक सोपी जाईल आणि सहानुभूती चा मोठा फायदा राष्ट्रवादीला आणि भालके कुटुंबाला होईल असा कयास बांधून ही उमेदवारी ठरवल्याची चर्चा आहे.
23 मार्च पासून नामनिर्देशन पत्र भरण्यास सुरुवात होणार आहे. तत्पूर्वीच राष्ट्रवादीकडून त्यांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. राष्ट्रवादीने जयश्रीताई भालके यांना पुढे केल्यानंतर भाजप, समाधान आवताडे ,पांडुरंग परिवार आणि शिवसेनेच्या नेत्या शैलाताई गोडसे हे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.