टेंभुर्णी येथील बेकरी चालकाच्या हत्येचे गूढ पोलिसांनी उकलले ,पोरानीच सहकाऱ्यांच्या मदतीने केली बापाची हत्या
पंढरपूर :- माढा तालुक्यातील शिराळ( टें) येथील एका व्यक्तीचा अत्यंत क्रुरपणे खून करुन मृतदेह टमटमसह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रकार काल उघडकीस आल्याने खळबळ उडाली होती . मात्र पोलिसांनी २४ तासात या हत्येचा गुंता सोडविला असून चारित्र्यहीन बापाची हत्या त्याच्या पोटच्या पोराने केल्याचे समोर आल्याचे करमाळा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ प्रशांत हिरे यांनी सांगितले . पोलिसांनी सध्या या प्रकरणात हत्या झालेला संजय काळे याचा मुलगा व या प्रकरणातील फिर्यादी आकाश काळे यांच्यासह त्याच्या दोन सहकार्यांना अटक केली आहे.
संजय काळे यांना टेंभर्णी-अकलूज रोडजवळील उजनी डावा उजवा कालव्याच्या साईटपट्टीला मारून त्यांचा मृतदेह वाहनासह जाळून टाकण्याचा प्रकार घडला होता . या प्रकरणात करमाळा DYSP प्रशांत हिरे यांनी संजय काळे याची माहिती गोळा करताना त्याचे चारित्र्य संशयास्पद वाटल्याने अधिक चौकशी करता त्याचा पोरगाच यात सामील असल्याचा संशय आल्यावर त्याला ताब्यात घेतले आणि संपूर्ण प्रकरणाचा उलघडा झाला . या हत्येत आकाश याने त्याचे मित्र लक्ष्मण बंदपट्टे व आलम मुलाणी ( दोघेही रा. सुर्ली ता. माढा) यांची मदत घेतल्याचे काबुल केले. अवघ्या सात हजार रुपयांची सुपारी घेतल्याचे पुढे आले आहे. वडिलांच्या वादग्रस्त चारित्र्यामुळे या बाप लेकात कायम वादंग होत होते. याच वादातून आकाश याने वडिलांची हत्या करून वाहनावर त्यांचा मृतदेह ठेवून जाळण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिल्यावर पोलिसांनी या तिघांनाही अटक केली आहे . आरोपीना आज न्यायालयात उभे केले असता ६ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे .