Home पंढरपूर राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या निवडीला भाजपच्या नगराध्यक्षांची उपस्थिती ; राजकीय पटलावर नव्या समिकरणाची...

राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या निवडीला भाजपच्या नगराध्यक्षांची उपस्थिती ; राजकीय पटलावर नव्या समिकरणाची नांदी !

1804
0

पंढरपूर :-सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षपदी पंढरपूरच्या कुमारी श्रेया किरण भोसले यांची निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणाताई सलगर यांच्या हस्ते नुकतेच प्रदान करण्यात आले. यावेळेस भाजपा पुरस्कृत पंढरपूर शहर विकास आघाडीच्या नगराध्यक्षा सौ. साधनाताई नागेश भोसले याही उपस्थित असल्याने एकच चर्चेचा विषय सध्या पंढरपुरात सुरू आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुधीर भोसले देखील उपस्थित होते.

पंढरपूरच्या राजकारणामध्ये भोसले कुटुंबाचा मोठा दबदबा आहे. सौ. साधनाताई नागेश भोसले या गेली साडे सहा वर्ष झालं पंढरपूरच्या नगराध्यक्ष म्हणून काम करीत आहेत. सौ साधनाताई भोसले या परिचारक गटाच्या नगराध्यक्ष म्हणून जरी निवडून आल्या असल्या तरी त्यांचे पती नागेश भोसले यांचे सर्व पक्षांमध्ये सलोख्याचे संबंध आहेत. सौ साधनाताई भोसले आणि नागेश भोसले वगळता जवळपास समस्त भोसले परिवार हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, पंढरपूर मंगळवेढा चे आमदार भारत नाना भालके यांचे समर्थक आहेत. त्यामुळे नगराध्यक्षा साधनाताई भोसले या तांत्रिक दृष्ट्या जरी परिचारक गटाच्या नगराध्यक्षा असल्या तरी त्यांच्या परिवाराचा राजकीय पिंड हा बहुतांश राष्ट्रवादी काँग्रेसला मानणारा आहे.

दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी कुमारी श्रेया किरण भोसले यांची निवड करण्यात आली. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष पदही भोसले परिवारामध्येच आहे. तर भोसले परिवाराचे ज्येष्ठ सदस्य माजी नगराध्यक्ष सुभाष दादा भोसले हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ पदाधिकारी आहेत.

पंढरपूरच्या राजकारणामध्ये नगराध्यक्षा सौ साधनाताई भोसले यांचे पती नागेश काका भोसले यांचा मुक्तपणे वावर असतो. शहर आणि तालुक्यातील सामाजिक, राजकीय व विकासात्मक घडामोडींवर नागेश भोसले यांचे सर्वपक्षियांशी सलोख्याचे संबंध आहेत.

शहराच्या राजकारणामध्ये विधानसभेला आमदार भारत नाना भालके आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नागेश भोसले असा एक पंढरपूरचा पॅटर्न तयार झालेला आहे अशी चर्चा पंढरपूर मध्ये कायमच केली जाते.

रविवारी कुमारी श्रेया भोसले यांच्या नियुक्तीचे पत्र देताना खुद्द नगराध्यक्षा साधनाताई भोसले, त्यांचे पती माजी उपनगराध्यक्ष नागेश काका भोसले, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीर भोसले, अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष सुरज भोसले आदी उपस्थित होते. हा भोसले परिवाराचा सोहळा जरी असला तरी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा ताई सलगर आणि राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित असल्याने या सोहळ्याची राजकीय चर्चा तर होणारच. पुढील वर्षी पंढरपूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. भोसले परिवारामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमदार भारत नाना भालके यांच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीची ताकद नक्कीच वाढणार आहे.