Home पंढरपूर श्री विठ्ठलच्या निवडणुकीचे पडघम ; विठ्ठल परिवार फुटीच्या उंबरठ्यावर

श्री विठ्ठलच्या निवडणुकीचे पडघम ; विठ्ठल परिवार फुटीच्या उंबरठ्यावर

693
0

श्री विठठलच्या निवडणुकीत स्वतंत्र पॅनेल उभा करण्याची काळे गटाची मागणी.

पंढरपूर :- श्री विठठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीमध्ये काळे गटाने स्वतंत्र निवडणुक लढवावी अशी अग्रही मागणी कार्यकर्त्यांनी कल्याणराव काळे यांचेकडे केली. येथील यशवंतराव चव्हाण पतसंस्थेच्या सभागृहात काल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली त्यामध्ये ही मागणी करण्यात आली. त्यामुळे श्री विठ्ठल परिवार फुटीच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. एका बाजूला धाराशिव कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील श्री विठ्ठलच्या आखाड्यात उतरले आहेत. त्यांचे आव्हान परतवून लावण्याची सत्त्वपरीक्षा विठ्ठल परिवरासमोर असतानाच परिवार फुटीच्या उंबरठ्यावर आल्याने चेअरमन भगीरथ भालके यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.

सध्या पंढरपूर तालुक्यात श्री विठठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे  वातावरण तापु लागले आहे. श्री विठठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत काळे गटाची काय भुमिका राहणार याकडे संपुर्ण तालुक्याचे लक्ष लागले  आहे. सहकार शिरोमणी वसंतदादा काळे यांनी कारखान्याचे चेअरमन असताना श्री विठठल सहकारीच्या विस्तारीकरण, कारखान्याचे प्रवेशद्वार बांधणे, कारखाना परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, यशवंतराव चव्हाण यांचे पुतळे उभा करणे, परिसरातील व कर्मचारी वसाहतीतील लोकांसाठी कारखाना कार्यस्थळावर हनुमान, विठठल रुक्मिणी, श्रीराम यांचे मंदिर उभारणे याच बरोबर कारखान्यातील कर्मचाऱ्यांना उच्चांकी बोनस वाटप करणे, ऊस उत्पादक सभासदांना जिल्ह्रयात सर्वाधिक ऊस दर देणे या सारखे महत्वाचे निर्णय घेतलेले होते. त्यांच्या पश्चात सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनीही संचालक मंडळामध्ये पाच वर्ष काम केले असून तसेच कै.वसंतदादा काळे यांचे चिरंजीव समाधान काळे यांनीही संचालक मंडळामध्ये काम केलेले आहे. त्यामुळे कल्याणराव काळे यांना माननारा सभासद वर्ग तालुक्यात मोठया प्रमाणात आहे. सध्या पंढरपूर तालुक्यातील प्रत्येक गावात काळे गटाचे कार्यकर्ते सक्रिय आहेत.

मागील दोन वर्षामध्ये साखर कारखानदारीसमोर अनेक अडचणी असताना कल्याणराव काळे यांनी श्री विठठल परिवाराचा घटक असलेल्या सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम सुरु करुन 4.50 लाख मे.टन ऊसाचे गाळप केलेले आहे. त्यामुळे परिवारातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना श्री विठठल सहकारी साखर कारखाना बंद असताना मोठया प्रमाणात दिलासा मिळाला आहे.


 
सध्या कल्याणराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहाकारी साखर कारखान्याबरोबर, यशवंतराव चव्हाण नागरी सहकारी पतसंस्था, प्रतिभादेवी नागरी सहकारी पतसंस्था, निशिगंधा सहकारी बँक, श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळ या सारख्या संस्थांच्या माध्यमातून हजारो कार्यकर्तेंचे जाळे तालुकाभर पसरले आहे.

श्री विठठल सहकारी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकरी, कामगार व तोडणी वाहतुक दारांची ऊस बीले मिळावीत यासाठी कल्याणराव काळे यांनी राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवारसाहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचेकडे सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला आहे. येत्या काळात शेतकऱ्यांची थकीत ऊस बीले देण्यासाठी त्यांच्या प्रयत्नांना यश येण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे कारखाना निवडणुकीमध्ये काळे यांनी सहकार शिरोमणी वसंतदादा काळे यांच्या विचाराचे स्वतंत्र पॅनेल निवडणुकीत उभा करावे अशी अग्रही मागणी कल्याणराव काळे यांचेकडे कार्यकर्त्यांनी केली आहे.

या बैठकीस सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन राजेंद्र शिंदे, संचालक बाळासाहेब कौलगे, गोरख जाधव, मोहन नागटिळक, भारत कोळेकर, ॲङतानाजी सरदार, आण्णा शिंदे, राजाराम पाटील, युवराज दगडे, सुधाकर कवडे, योगेश ताड,नागेश फाटे, प्रदीप बागल, इब्राहिम मुजावर, माजी संचालक राजसिंह माने, तानाजी जाधव, भारत भुसे, शिवाजी जाधव,शुकुर बागवान, विठठलचे संचालक उत्तम नाईकनवरे, महादेव देठे, समाधान काळे, यशवंतराव चव्हाण नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळूंखे, संचालक हणमंत दांडगे,शंकर कवडे,  प्रतिभादेवी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन विष्णु यलमार, व्हा.चेअरमन सादीक मुलाणी, संचालक विलासराव काळे, कांतीलाल काळे या पदाधिकारीसह अनिल नागटिळक, नारायण शिंदे, अर्जुन जाधव, सिध्देश्वर चव्हाण, रेवणसिध्द पुजारी, लक्ष्मण नलवडे, कालिदास चव्हाण, अक्षय पवार, रघुनाथ पिसे, महादेव सुर्यवंशी, सुनिल पाटील, रणजित जाधव,भारत माने हे कार्यकर्ते उपस्थित होते.