Home पंढरपूर दोनशे कोटी रुपयांची “माती” खाणारे हाजीर हो ! थेट उपमुख्यमंत्री अजित पवार...

दोनशे कोटी रुपयांची “माती” खाणारे हाजीर हो ! थेट उपमुख्यमंत्री अजित पवार करणार चौकशी

903
0

पंढरपूर :- देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा ड्रिम प्रोजेक्ट असणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेचे दोनशे कोटी रुपयांची “माती” खाणाऱ्यांची आता थेट उपमुख्यमंत्री अजित पवार सुनावणी घेणार आहेत. शहरात बांधण्यात येणाऱ्या या योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याच्या अनेक तक्रारी आल्याचे खूद्द अजित दादांनीच पंढरपूर पहाणी दौऱ्यावर असताना सांगितले होते. आता शुक्रवारी पुण्यात याची चौकशी खुद्द अजित दादा करणार आहेत. त्यामुळे नगरपालिकेचे धाबे दणाणले आहेत.

पंढरपूर झोपडपट्टी मुक्त व्हावे यासाठी आमदार प्रशांत परिचाकर यांनी ही योजना पंढरपूरात मंजूर करुन घेतली. मात्र काम सुरु झाल्यानंतर नगरपालिकेच्या काही अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी या योजनेकडे दुभती गाय म्हणूनच पाहिले. कुणी खडी तर कुणी विटा तर अनेकांनी वाळू , क्रश सॅंड पुरवठ्याचे ठेके घेतले. काहींना तक्रारी करुन आपले उखळ पांढरे करुन घेतल्याची चर्चा पंढरपूरच्या चौकाचौकात आहे. त्यामुळे हा खर्च काढण्यासाठी ठेकेदाराने थेट पायाभरणीला काळी मातीच वापरण्यास सुरवात केली.

मुळात पूरग्रस्त भागात कोणतेही नविन बांधकाम करण्यास परवानगी नसताना चक्क विशेष बाब म्हणून पुर्वीच्या कचरा डेपो, दलदलीच्या ठिकाणी मंजुरी देण्यात आल्याचे सांगण्यात येते. या निकृष्ट बांधकामाविषयी अनेकांनी तक्रारी करून सुध्दा बहुमताच्या जोरावर वेळ मारून नेण्यात आली. सदरची योजना पुररेषाच्या आत नसल्याचा दावा मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी अनेक वेळा केला.

१६ ऑक्टोबरच्या सकाळी आलेले पुराचे पाणी

मात्र चार दिवसांपूर्वी आलेल्या महापुराचे पाणी या बांधकामामध्ये पोहचले होते. या योजनेच्या तीन बाजु पाण्याने वेढल्या होत्या. जवळपास ७ ते ८ फुट पाणी याठीकाणी होते. मात्र तरीही हा विषय चेष्टवर घेण्यात येत होता. आम्ही टेक्निकली खूपच स्ट्रॉंग (सक्षम) असल्याचा दावा उसने अवसान आणून अधिकारी करीत होते. तर पदाधिकारी आपल्याच्या नेत्याच्या स्वप्नाची चेष्टा करताना दिसत होते.
यावर आमदार भारत भालके, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांना चौकशीचे आदेश दिले. गाडी पुढे गेलीच नाही. अतिवृष्टीमुळे कुंभार घाटाची भिंत पडल्याने सहा निष्पाप जिवाचा जीव गेला. या घाटाच्या बांधकामात देखिल “मातीच” खाल्ल्याचे खूद्द अजित पवारांनी पाहिले. प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामाच्या अनेक तक्रारी आपल्या कानावर आल्याचे अजित दादांनी प्रसिद्धी माध्यमांच्या समोर सांगितले. आता स्वतः जातीने चौकशी करण्याचा निर्णय अजित दादांनी घेतला. आपण सत्तेत असताना हजारो कोटी रुपये पंढरपूरच्या विकासाला दिले. मात्र पंढरपूर आजही भकास दिसत असल्याची खंत दादांनी या दौऱ्यात व्यक्त केली.


आता खुद्द अजित दादा चौकशी करणार म्हणाल्यावर अधिकाऱ्यांची धावपळ सुरु झालीय. आवास नोंदणी करण्याचे गेली पाच महिने बंद पडलेले कार्यालय सुरु करण्याचा दिखावा केला जातोय. कागदोपत्री “सक्षम” दाखविण्यासाठी वेगवेगळे दाखले जोडले जात असल्याचे समजते. एकंदरीतच निकृष्ट दर्जाच्या कामांची कामाची चौकशी झाल्यास निष्पाप लोकांचे जीव तरी वाचतील.

एकंदरीतच पंढरपूराती हा युपी-बिहार पॅटर्न बंद व्हावा आणि दर्जेदार विकास कामे व्हावीत अशी मागणी काही जाणकारांनी अजित दादांकडे केल्याचे समजते.