Home पंढरपूर खासगी सावकाराच्या पठाणी वसूलीला कंटाळून बालाजी मलपेंचा गळफास घेवून आत्महत्येचा प्रयत्न.

खासगी सावकाराच्या पठाणी वसूलीला कंटाळून बालाजी मलपेंचा गळफास घेवून आत्महत्येचा प्रयत्न.

4751
0

पंढरपूर :- देशात कोरोना महामारीने सामान्य नागरिकांच्या हातचे काम गेले, तोंडचा घास गेला. लॉकडाऊनने उपासमारीची वेळ गोरगरिबांवर आलीय. अशा परिस्थितीत सरकारने सर्व बॅंकांची वसूली, सरकारी वसूली बंद केलीय. मात्र खासगी सावकारांचा हैदोस सुरुच आहे. आज पंढरपूरमध्ये बालाजी धोंडीराम मलपे (वय -३४ रा. इसबावी) यांनी गळफास घेवून आत्महत्येचा प्रयत्न केलाय.


याबद्दलची त्यांच्या नातेवाईकांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, बालाजी मपले हा युवक पुर्वी बाजार समितीमध्ये काम करत होता. त्यानंतर त्याने स्वतःचा आईसक्रीम विक्रीचा व्यवसाय सुरु केला. याच दरम्यान त्याने व्यवसायासाठी बाजार समिती आणि इसबावी परिसरातील खासगी सावकारांकडून कर्ज काढले. आपल्या व्यवसायाच्या जीवावर त्याने दहा ते वीस टक्के व्याजाने पैसे फेडले. व्याजावर व्याज घेवून देखिल या सावकारांची भूक काही भागेना. सावकारांनी लॉकडाऊनच्या काळात देखिल बालाजीला पैशांसाठी तगादा लावण्यास सुरवात केली.
पठाणी दराने सर्व कर्ज फेडलेले असताना देखिल सावकारांनी बालाजीचा पिच्छा काही सोडला नाही. लॉकडाऊनमुळे संसाराचा गाडा चालविणे मुश्किल झालेल्या दोन मुलांच्या बापाने अखेर जीवनच संपवण्याचा निर्णय घेतला. मात्र कुटुंबाच्या सतर्कतेमुळे त्यांनी बालाजीच्या गळ्याचा फास सोडवून त्याला खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल केले. सध्या बालाजीची परिस्थिती गंभीर आहे. दरम्यान या खासगी सावकारांवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय बालाजी मलपेंच्या कुटुंबाने घेतला आहे.