Home पंढरपूर डीएनए चेक करण्याची भाषा करणाऱ्या रामा गायकवाडवर अखेर गुन्हा दाखल.

डीएनए चेक करण्याची भाषा करणाऱ्या रामा गायकवाडवर अखेर गुन्हा दाखल.

12273
0

पंढरपूर :- पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे राहणाऱ्या विराज जगताप हत्याकांडांवरुन फेसबुक लाईव्ह व्दारे दलितांचा डीएनए चेक करण्याची मागणी करणारा तथाकथित समाजसेवक राम गायकवाड याचेवर पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनीच याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

आंबेडकरी संघटनांनी याप्रकरणी गेली आठ दिवस झाले आंदोलने उभी केली होती. अखेर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी कोरोना आढावा बैठकीसाठी सोलापूरला आले असता जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांची भेट घेवून गुन्हा दाखलच झाला पाहिजे अशी मागणी केली होती. तर आरपीआयसह इतर संघटनांनी आषाढीच्या शासकीय महापूजेपासून मुख्यमंत्र्यांना रोखण्याचा इशारा दिला होता.

या घटनेची सविस्तर माहिती अशी की, बौध्द युवक विराज जगताप हत्या प्रकरणावरुन तथाकथित समाजसेवक राम गायकवाड याने १३ जून रोजी फेसबुक लाईव्हद्वारे डीएनए चेक करण्याची मागणी करत दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे वक्तव्य केले होते.
यावर आंबेडकरी संघटनांनी प्रशासनाला धारेवर धरत राम गायकवाड वर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या बैठकीत घुसून गोंधळ घातला होता. तसेच गुन्हा दाखल न झाल्यास आषाढी एकादशीच्या महापूजेपासून मुख्यमंत्र्यांना रोखण्याचा इशारा आरपीआयचे नेते आप्पासाहेब जाधव, सुनिल सर्वगोड, जितेंद्र बनसोडे, बाळासाहेब कसबे,नगरसेवक कृष्णा वाघमारे, किशोर खिलारे, कुमार भोसलेंनी दिला होता. तर शारदाताई इंगळे, उमेश सर्वगोड, गणेश उबाळे, यांनी अनेक युवक आणि महिलांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ ठिय्या मांडत डीएनए चेक करण्याची मागणी केली होती. ॲड. किर्तीपाल सर्वगोड यांनी रितसर फिर्याद दाखल केली होती. तर राज्यातून रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर, दिपक केदार, अकलूजचे धीरज मोरे, सोलापूरचे डोलारे , वंचितचे सागर गायकवाड, अशोक गवळी, रोहित एकमल्ली, दिपक माने, अमर शेवडे यांनी निवेदन देवून कारवाईची मागणी केली होती.
मात्र उद्रेक वाढत असताना देखिल पोलिसांनी वेळखाऊ धोरण घेतले होते.
अखेर गुरुवारी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर हे कोवीड आढावा बैठकीसाठी सोलापूरला आले असता नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी त्यांच्या कानावर सविस्तर घटना कथन केली. त्यांनी तात्काळ पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि ग्रामीण पोलिस अधिक्षकांशी चर्चा करून गुन्हा दाखलच झाला पाहिजे अशी भुमिका घेतली. अखेर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवारांवर केलेल्या टीकेनंतर गोपीचंद पडळकरांवर गुन्हा दाखल झाल्याने सरकारला आंबेडकरी चळवळीसमोर झुकावे लागले.
पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याचे एपीआय ए.एम. खरात यांच्या फिर्यादीवरुन राम गायकवाड वर दोन समाजात तेढ निर्माण करणे, एखाद्या समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणे, भडकावू विधाने करुन निरनिराळ्या समाजात शत्रूत्वाची भावना निर्माण करणे. हे आरोप ठेवत भादवि ५०५(२), ५०४ आणि ५०६ नुसार जामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.