Home पंढरपूर रतनचंद शहा बँकेच्या टेंभुर्णी शाखेत साडे पाच कोटी रुपयांचा घोटाळा ; तत्कालीन...

रतनचंद शहा बँकेच्या टेंभुर्णी शाखेत साडे पाच कोटी रुपयांचा घोटाळा ; तत्कालीन शाखाव्यवस्थापक आणि रोखपालाविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल

612
0

पंढरपूर :- रतनचंद शहा सहकारी बँकेच्या टेम्भुर्णी शाखेत साडे पाच कोटी रुपयांचा अपहार झाला असून बँकेचा तात्कालीन शाखाधिकारी आणि रोखपाल यांच्याविरोधात बँकेचे सरव्यवस्थापक अरविंद नाझरकर यांनी फिर्याद दिली आहे.त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

याबाबत टेंभुर्णी ठाण्याचे निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी पत्रकारांना अधिक माहिती देताना संगीतले की, मंगळवेढा येथील रतनचंद शहा बँकेच्या टेंभुर्णी शाखेत 2016 ते 2020 या कालावधीत बँक ऑफ इंडिया, जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेच्या टेंभुर्णी शाखेच्या खात्यावरील तसेच हातावरील शिल्लक अशा एकूण 5 कोटी 57 लाख 2 हजार 822 रुपयांचा अपहार केला आहे. या प्रकरणी बँकेचे तत्कालीन सेवानिवृत्त शाखाधिकारी हरिदास निवृत्ती राजगुरू ( रा. सांगोला ) तसेच तत्कालीन रोखपाल अशोक भास्कर माळी ( रा.टेंभुर्णी ता.माढा ) यांच्याविरोधात बँकेचे सरव्यवस्थापक अरविंद नाझरकर यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच तपास कामी पथके नेमून आरोपींचा शोध सुरू केला आहे. बँकेच्या या घोटाळ्यावरून सभासद आणि ठेवीदांरामध्ये खळबळ उडाली आहे.