संस्थेचे अध्यक्ष आणि संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्याची ठेविदारांची मागणी.
पंढरपूर :- येथील संकल्प नागरी पतसंस्थेत झालेल्या कथित गैरव्यवहार प्रकरणी जिल्हा सहाय्यक निबंधक यांच्याकडून नेमण्यात आलेल्या लेखाधिकारी यांच्याकडून तपासणी अहवाल प्राप्त झाला आहे. यामध्ये चेअरमन व संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्याबाबतचा पंढरपूर शहर पोलिसांना देण्यात आला आहे.
दरम्यान, जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाकडे याबाबत परवानगी मागितल्याचे तपास अधिकारी कपिल सोनकांबळे यांनी सांगितले.
येथील संकल्प नागरी पतसंस्थेचे चेअरमन प्रथमेश कट्टे व व्यवस्थापक अविनाश ठोंबरे यांनी मुदत ठेवेवर अकर्षक व्याजदर देण्याचे तसेच लकी ड्रॉ स्क्रीम चे आमिष दाखवून तीन ते चार वर्षापूर्वी अनेक खातेधारकांकडून सुमारे ३ कोटीहून अधिकच्या ठेवी जमा करून घेतल्या. हे करीत असताना मोठ्या प्रमाणात दहीहंडी, मनोरंजनाचे कार्यक्रम घेण्यात आले. जिल्हा निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे संस्था नोंदणी असल्याचे सांगून, अनेकांकडून अकर्षक व्याजदर देणार असल्याचे सांगून ठेवी जमा केल्या. काही मंडळींना दर तीन ते सहा महिण्याला परतावा देण्यात आला. परंतु दीड वर्षापूर्वी जेंव्हा खातेदारांनी ठेवी परत मागण्यास सुरूवात केली, तेंव्हा उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरूवात झाली. संस्था बंद करण्यात येऊन चेअरमन व व्यवस्थापक ही मंडळी नॉट रिचेबल झाली. अद्यापही ही मंडळी पंढरपूर शहराबाहेर फिरत आहे.
आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच पंढरपूर शहरातील सात ते आठ जणांनी पतसंस्थेचे चेअरमन व संचालक मंडळाविरोधात जिल्हा निबंधक सहकारी संस्था तसेच पंढरपूर शहर पोलिसात तक्रार दिली. संस्थेच्या तपासणीसाठी लेखाधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली. त्यांच्याकडून २५ डिसेंबर २०२२ रोजी तपासणी पूर्ण करून पोलिसाकडे गुन्हा नोंद करण्याबाबतचा अहवाल देण्यात आला आहे. महिन्यानंतरही अद्याप गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे याबाबतचा पत्रव्यवहार सुरू असल्याचे तपास अधिकारी सोनकांबळे यांनी सांगितले.