Home पंढरपूर घोटाळा ; सामाजिक वनीकरण विभागातील अनुदान अपहार प्रकरणी न्यायालयाचे चौकशीचे आदेश

घोटाळा ; सामाजिक वनीकरण विभागातील अनुदान अपहार प्रकरणी न्यायालयाचे चौकशीचे आदेश

419
0

पंढरपूर :- राज्य सरकारच्या तेहतीस कोटी वृक्ष लागवड योजनेत पंढरपूर येथील सामाजिक वनीकरण विभागातील अधिकारी व कर्मचार्यांनी कोट्यावधी रुपयांचा अपहार केल्याची तक्रार येथील न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
या प्रकरणी येथील न्यायालयाने पंढरपूर शहर पोलिसांना चौकशी करुन अहवाल
सादर करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या चौकशी आदेशामुळे सामाजिक वनीकरण विभागातील अधिकार्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

राज्य सरकारने राज्यात तेहतीस कोटी वृक्ष लागवड करण्याचा कार्यक्रम हाती घेतला होता. त्यानुसार पंढरपूर येथील सामाजिक वनीकरण विभागाने सन 2019-20 मध्ये पंढरपूर शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड
केल्याचे दाखविले आहे. दरम्यान या तेहतीस कोटी वृक्ष लागवड योजनेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याची तक्रार दादासाहेब चव्हाण यांनी सामाजिक वनीकरण विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांकडे केली होती.
वरिष्ठ अधिकार्यांनी तक्रारीची दखल घेतली नाही.

त्यानंतर श्री. चव्हाण यांनी येथील सामाजिक वनीकरण विभागाचे वनरक्षक संतोष नवघरे, वनक्षेत्रपाल किशोर आहिरे, वनमजूर आंबन्ना जेऊर यांच्यासह इतर 5 कर्मचार्यांनी एकत्रित येवून बोगस मजूर दाखवून 1 कोटी 25 लाख
रुपयांचा अपहार केल्याची तक्रार 27 आॅगष्ट 2021 रोजी पंढरपूर येथील न्यायालयात दाखल केली होती. त्यावर आज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम.आर
कामत यांनी याप्रकरणी 156 कलमा अन्वये 12 सप्टेंबर पर्यंत चौकशी करुन चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश पंढरपूर शहर पोलिसांना दिले आहेत.
न्यायालयाच्या आदेशामुळे वन विभागात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिस तपासामध्ये येथील वृक्ष लागवड गैरव्यवहाराची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

याबाबत सामाजिक वनीकरण विभागाच्या वनअधिकारी
श्रीमती मनिषा पाटील यांच्याशी भ्रमध्वनीवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला,असता उशिरा पर्यंत त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही.