Home क्राईम धक्कादायक ; दुधात केमिकलची भेसळ करणारी टोळी पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी केली गजाआड

धक्कादायक ; दुधात केमिकलची भेसळ करणारी टोळी पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी केली गजाआड

1141
0

पंढरपूर :- दुधामध्ये घातक केमिकलची भेसळ करणाऱ्या टोळीवर पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 14 कॅन केमिकल जप्त करण्यात आलं आहे. हे केमिकल फुल चिंचोली येथील एका डेअरीमध्ये घेऊन जात असल्याची माहिती पुढे येत आहे. दुधाची गुणवत्ता वाढवण्यासाठी या केमिकलचा वापर केला जात असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पोलीस हवालदार नवनाथ सावंत हे 16 जानेवारी रोजी ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत रात्रगस्त करीत होते. मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास टाटा इंट्रा, अशोक लेलँड अशी दोन संशयित वाहने नवीन वाखरी-गुरसाळे बायपास फ्लाई ओव्हर पुलाजवळ त्यांना दिसून आली. त्यामधील टाटा इंट्रा टेम्पोमध्ये दूध भरण्याचे रिकामे 19 कॅन व दुसऱ्या अशोक लेलँड टेम्पोमध्ये निळ्या रंगाचे प्लास्टिकचे 14 कॅन त्या मध्ये पांढऱ्या रंगांचे लिक्विड भरलेले दिसून आले. तिथे उपस्थित असणाऱ्या तिघांची चौकशी केली असता या कॅन मध्ये दुधामध्ये भेसळ करण्याचे केमिकल असल्याचे लक्षात आले. याप्रकरणी निलेश बाळासाहेब भोईटे (वय 30 वर्ष रा. रो हाऊस क्रमांक 38, वृंदावनम सोसायटी, टाकळी) परमेश्वर सिद्धेश्वर काळे (वय 40 वर्ष रा. काळे मळा, फुलचिंचोली ) आणि गणेश हनुमंत गाडेकर (वय 25 वर्ष रा. सुरेंद्र कुलकर्णी यांचे घरी, गणेश नर्सरी जवळ, टाकळी रोड, पद्मावती, पंढरपूर) या तिघांना ताब्यात घेतलं आहे.
सदर बाबत तिघांकडे दुधाचे रिकामे कॅन आणि प्लास्टिकच्या कॅनमध्ये असलेले पांढरे लिक्विड याबाबत सखोल चौकशी केली असता सदरचे लिक्विड सुमित मेहता (रा. वडगाव निंबाळकर ता. बारामती) यांचेकडून दुधात भेसळ करण्याकरता आणलेले आहे असे सांगितलेले आहे.

सदर बाबत अन्न व औषधी प्रशासन विभाग यांना कळविण्यात आले असून सदर विभागाचे पथक पोलीस ठाणे पंढरपूर ग्रामीण येथे आले असून त्याचे नमुने घेण्यात आले आहेत. असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिली.
सदर बाबत अन्न व औषधी प्रशासन विभागाकडून फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
दुधामध्ये घातक केमिकलची भेसळ करून ग्राहकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. अशा टोळींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी आता होत आहे.