Home पंढरपूर आषाढी यात्रेपूर्वी जाहीर होणार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती ; अध्यक्षपदासाठी “हे”...

आषाढी यात्रेपूर्वी जाहीर होणार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती ; अध्यक्षपदासाठी “हे” नाव आहे आघाडीवर

2323
0

अध्यक्ष पदासाठी वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष ह.भ.प विठ्ठल पाटील यांचे आघाडीवर

पंढरपूर :- भाजप शिवसेना युतीच्या सत्ता काळात नियुक्त करण्यात आलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची मुदत 3 जुलै 2022 रोजी संपत आहे. 12 जुलै रोजी आषाढी यात्रेचा सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे आषाढीच्या सोहळ्यापूर्वीच नवीन समिती अस्तित्वात येणार असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली आहे. ही समिती काँग्रेसकडे गेल्याने वारकरी साहित्य परिषदेचे संस्थापक-अध्यक्ष ह.भ.प. विठ्ठल पाटील यांचे नाव अध्यक्षपदासाठी आघाडीवर असल्याची चर्चा आहे.

काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील सोलापूर मध्यच्या आमदार प्रणिती ताई शिंदे आणि ह.भ.प. विठ्ठल पाटील ही तीन नावे चर्चेत होती.
मात्र कुणाल पाटील यांनी अध्यक्षपदासाठी नकार दिल्याचे समजते तर आमदार प्रणितीताई शिंदे यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही दोन नावे स्पर्धेतून कमी झाल्याने विठ्ठल पाटील यांची निवड होणार हे जवळपास निश्चित झाल्याचे समजते.

सध्या अस्तित्वात असणारी समिती शिवसेना-भाजपा युतीच्या सत्ता काळात नियुक्त झाली होती. 3 जुलै 2017 रोजी कराडचे अतुल भोसले यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या या समितीमध्ये एकूण पंधरा सदस्य होते.
वादग्रस्त कारणावरून अनुसूचित जमाती प्रवर्गातील सदस्याचे सदस्यत्व रद्द करण्यात आले तर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी राजीनामा दिला. समितीच्या पदसिद्ध सदस्य असणाऱ्या नगराध्यक्ष यांचाही कार्यकाल संपुष्टात आल्याने सध्या 12 सदस्य समितीचे कामकाज पहातात. या समितीची मुदत 3 जुलै 2022 रोजी संपत आहे. 12 जुलै रोजी आषाढी एकादशी चा सोहळा संपन्न होत आहे. तब्बल दोन वर्षांनी आषाढी यात्रा साजरी होणार असल्याने मोठ्या प्रमाणात भाविक विठ्ठल दर्शनासाठी पंढरपुरात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या भाविकांना सुखसुविधा देण्यासाठी मंदिर समिती अस्तित्वात असणे गरजेचे आहे. त्यामुळेच आषाढी एकादशीच्या सोहळ्यापूर्वी नवीन समिती अस्तित्वात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये पंढरपूर मंदिर समिती राष्ट्रवादीकडे होती. मात्र नव्याने झालेल्या शिवसेना ,राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकास आघाडी सरकारच्या काळात ही समिती काँग्रेसला देण्यात आली आहे.
वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून वारकऱ्यांसाठी अनेक उपक्रम राबवणारे भाविकांसाठी स्वखर्चाने सोयीसुविधा उपलब्ध करणारे ह.भ.प विठ्ठल पाटील यांचे नाव सध्या आघाडीवर आहे.

विठ्ठल पाटील यांचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांचे ,पदाधिकाऱ्यांचे सलोख्याचे संबंध आहेत.
त्याच बरोबर वारकरी फडकरी दिंडी समाज या सर्व वारकरी संप्रदायातील महाराज मंडळींना घेऊन विठ्ठल पाटील हे अनेक उपक्रम राबवत असतात. त्यामुळे काही मोठ्या घडामोडी न घडल्यास ह.भ.प विठ्ठल पाटील यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होणार असल्याची शक्यता आहे.