Home पंढरपूर सोलापूर जिल्हा नियोजन समिती जाहीर. आमदार पडळकर समर्थकांना स्थान नाहीच.

सोलापूर जिल्हा नियोजन समिती जाहीर. आमदार पडळकर समर्थकांना स्थान नाहीच.

382
0

सोलापूर :- जिल्हा नियोजन समितीवर वीस सदस्यांच्या नव्याने निवडी करण्यात आल्या आहेत. या निवडीत भारतीय जनता पक्षाने बाजी मारल्याचे दिसून येत आहे. यात 6 सदस्य शिंदे गटाचे असून इतर 14 भाजपचे सदस्य आहेत. पंढरपूर मधून माजी आमदार प्रशांत परिचारक यांनाच एकट्यालाच संधी दिली आहे. तर आमदार गोपीचंद पडळकर यांचे कट्टर समर्थक माऊली हळणवर आणि प्राध्यापक सुभाष मस्के यांना मात्र डावलले आहे. महाविकास आघाडीच्या काळात पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी 14 पैकी 7 सदस्य धनगर समाजाचे घेतले होते. भाजपने मात्र दोनच धनगर समाजाच्या चेहऱ्यांना संधी दिलीय. जिल्हा नियोजन समितीची सभा येत्या शुक्रवारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे.
शेतकरी आंदोलनातून पुढे आलेले माऊली हळणवर यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून भाजपमध्ये प्रवेश केला. महाराष्ट्रात ते कट्टर पडळकर समर्थक म्हणून ओळखले जातात. भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेवर आणि विशेषतः पवार कुटुंबावर सडकून टीका करण्याचे एकच काम केले. तर पंढरपुरात परिचारकांच्या पांडुरंग परिवारामध्ये परिचारक समर्थक म्हणून आपला ठसा उमटवला. सत्तांतर झाल्यानंतर माऊली हळणवर यांनी जिल्हा नियोजन समितीवर सदस्य म्हणून निवड व्हावी यासाठी मोठे प्रयत्न केले. आमदार समाधान दादा अवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह अनेक आजी-माजी आमदारांच्या पाठिंबाचे पत्र देखील घेतले. मात्र भाजपा लेखी ते दुर्लक्षितच राहिले. ना पवारांवरील टीका त्यांच्या कामी आली, ना पडळकर समर्थक पद ना परिचारक समर्थक चेहरा उपयोगी आला. अदखलपात्र म्हणूनच ते भाजपमध्ये दिसून आले. तर दुसरे पडळकर समर्थक प्राध्यापक सुभाष मस्के यांना देखील भाजपने संधी दिली नाही.
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी धनगर समाजाच्या सात पदाधिकाऱ्यांना नियोजन समितीवर घेतले होते. या काळात हळणवर आणि म्हस्के या जोड गोळीने भरणे यांच्या विरोधात आंदोलनाचा सपाटा लावला होता. आज मात्र फक्त दोनच सदस्य धनगर समाजाचे घेतले. आणि हळणवर व मस्के यांना डावल्याने आता हे दोघे काय भूमिका घेणार याकडे पंढरपूरचा लक्ष लागलं आहे.

नूतन सदस्य पुढीलप्रमाणे आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि आमदार समाधान आवताडे (दोघेही भाजप) यांना संधी देण्यात आली आहे. जिल्हा नियोजनशी संबंधित ज्ञात असलेल्या समितीमधून अण्णाराव बाराचारे (कुंभारी, ता. दक्षिण सोलापूर), शिवाजी सावंत (शिंदे गट, वाकाव, ता. माढा), धैर्यशील मोहिते पाटील (भाजप, अकलूज, ता. माळशिरस), माजी आमदार प्रशांत परिचारक (भाजप, पंढरपूर) यांना संधी देण्यात आली आहे.

विशेष निमंत्रित सदस्य म्हणून चनगोंडा हावनाळे (ब्रदर, ता. दक्षिण सोलापूर), चेतनसिंह केदार (सांगोला भाजप), गणेश चिवटे (करमाळा भाजप), योगेश बोबडे (टेंभुर्णी, ता. माढा), केशवराव पाटील (निमगाव, ता. माळशिरस), सुनील चव्हाण (टाकळी सिकंदर, ता. मोहोळ), प्रदीप खांडेकर (भाजप, हिवरगाव, ता. मंगळवेढा), रफिक नदाफ (सांगोला), उमेश गायकवाड (सलगरवाडी सोलापूर), विजय गरड (पांगरी, ता. बार्शी), नारायण पाटील (जेऊर, ता. करमाळा, शिंदे गट), अमोल शिंदे (उत्तर कसबा, सोलापूर शिंदे गट), नागेश भोगडे(उत्तर कसबा, सोलापूर), अशोक दुस्सा (न्यू,पाच्छापेठ, सोलापूर) यांची निवड करण्यात आली आहे.

यापूर्वी राज्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षाची महाविकास आघाडीची सत्ता असताना पालकमंत्री पदी दत्तात्रय भरणे होते त्यावेळी झालेल्या निवडी नंतर सरकार पडल्यावर रद्द झाल्या त्यामुळे आता या नवीन 20 सदस्यांना जिल्हा नियोजन समितीवर सदस्य म्हणून घेण्यात आले आहे.