Home पंढरपूर शिक्षक मतदारसंघातून कॉंग्रेसचा उमेदवार ; पक्षीय राजकारणामुळे विद्यमान शिक्षक आमदार दत्तात्रेय...

शिक्षक मतदारसंघातून कॉंग्रेसचा उमेदवार ; पक्षीय राजकारणामुळे विद्यमान शिक्षक आमदार दत्तात्रेय सावंत अडचणीत.

1571
0

पंढरपूर:- पुणे शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत यावेळी मोठी चुरस पहायला मिळणार आहे. या निवडणूकीत थेट महाविकास आघाडी आणि भाजप आमने सामने येणार आहे. पुणे शिक्षक मतदार संघ काॅंग्रेसला तर पदवीधर मतदासंघ राष्ट्रवादीच्या वाटयाला आला आहे. काॅंग्रेसने  शिक्षक मतदार संघातून कोल्हापूरचे  जयंत  आसगावकर यांना  उमेदवारी जाहीर केली आहे. तर भाजप प्रणित शिक्षक परिषदेचे  सोलापूर येथील जितेंद्र पवार यांना उमेदवारी दिली आहे. पदवीधर साठी राष्ट्रवादीने जेष्ठ नेते अरुण लाड यांना उमेदवारी दिलीय तर भाजपने संग्राम देशमुखांना मैदानात उतरवले आहे.

काॅंग्रेस आणि भाजपने स्वतंत्र उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याने विद्यामान शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांची कोंडी झाली आहे. महाविकास आघाडी आणि भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने आमदार सावंत यांना धोका निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

आमदार सावंत हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवारांच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे काही तरी करिष्मा घडण्याची सावंत समर्थक आशा लावून बसले होते. मात्र पुणे  शिक्षक आणि पदवीधर विधानसभा मतदार संघात गेल्या सहा वर्षामध्ये अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये नव्याने सत्तेत आलेल्या राष्ट्रवादी, काॅंग्रेस आणि शिवसेनेने राज्यातील पाचही शिक्षक आणि पदवीधर मतदार संघातील निवडणुक प्रतिष्ठेची केली आहे.

पुणे मतदार संघातील दोन्ही जागा ताब्यात घेण्यासाठी महाविकास आघाडीने चंग बांधला आहे.

2014 साली झालेल्या पुणे शिक्षक मतदासंघातून अपक्ष असलेले उमेदवार दत्तात्रय सावंत यांनी विद्यमान आमदार भगवानराव साळुंखे यांचा धक्कादायक पराभव केला होता. तर दुसरीकडे पदवीधर मतदासंघात मतविभागणीचा फायदा भाजपला मिळाला होता.

यावेळी कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी काॅंग्रेस,राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी कंबर कसली आहे.

तर भाजपने ही राजकीय मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. पदवीधर बरोबरच शिक्षक मतदार संघात चमत्कार घडविण्याच्या दृष्टीने भाजपचे पदाधिकारी कामाला लागले आहेत. पक्षीय राजकारणाच्या साठमारीत अपक्ष उमेदवार आमदार दत्तात्रय सावंत हे कशी लढत देणार याकडेच लक्ष लागले आहे. आमदार सावंत यांचा दांडगा संपर्क त्यांची जमेची बाजू मानली जातेय. मात्र पक्षीय राजकारणात त्यांचा निभाव लागनं कठीण मानलं जातय.

काॅंग्रेसचे उमेदवार जयंत आसगावकर हे कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. शिक्षण संस्था संघटनेचे राज्य  सचिव म्हणून ते काम करत आहेत. पुणे विभागातील अनेक शैक्षणिक संस्था आणि शिक्षकांचा त्यांचा थेट संपर्क आहे. पुणे विभागात काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे शैक्षणिक संस्थांचे जाळे मोठे आहे. त्यामुळे काॅंग्रेसच्या उमेदवारीमुळे विद्यामान आमदार दत्तात्रय सावंत अड़चणीत येण्याची शक्यताही राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत यांनी मागील दोन महिन्यांपासूनच तयारी सुरु केली आहे. त्यांनी आता पर्यंत गाठीभेटीची पहिली फेरी पूर्ण केली आहे. गेल्या सहा वर्षामध्ये त्यांनी चांगले काम केले आहे. आता पर्यंत सुमारे 25 हजार शिक्षकांच्या भेटी घेतल्या आहेत. त्यांच्या चांगल्या कामाची पोच पावती पुन्हा शिक्षक त्यांना निवडून असा विश्वास सावंत समर्थकांना वाटतोय.