Home सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकरांची ग्वाही ; नेत्रदान चळवळीत प्रशासन म्हणून आराधना संस्थेस कायम...

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकरांची ग्वाही ; नेत्रदान चळवळीत प्रशासन म्हणून आराधना संस्थेस कायम सहकार्य.

190
0

सोलापूर : आराधना सामाजिक संस्थेने मनोरंजनातून नेत्रदान प्रचार प्रसार करण्याचा जो उपक्रम हाती घेतला आहे तो उपक्रम नसून त्यांनी उभी केलेली चळवळ आहे. खरे तर हे काम प्रशासनाचे आहे मात्र आराधनाच्या या कार्यास प्रशासन म्हणून आमचा कायम पाठिंबा राहील अशी ग्वाही देताना आपल्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या दृष्टी बाधितांना आणि पत्रकारितक्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांना आदर्श पुरस्काराने गौरविणे हे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढले.

आराधना संस्था आणि मधुरिया टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय आदर्श पुरस्काराचे वितरण रविवारी सायंकाळी फडकुले सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, नेत्ररोग तज्ञ डॉक्टर माधुरी वाळवेकर, पोलीस निरीक्षक विजयालक्ष्मी कुर्री, निवृत्त पोलीस अधिकारी दत्तात्रय सुरवसे, उद्योजक अजित कोठारी, संस्थेच्या अध्यक्षा मयुरा पोतदार, उपाध्यक्ष शरद पोतदार, सचिव नंदकुमार महामुनी, सहसचिव अमोल पोतदार, निमंत्रित दत्ता काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या सोहळ्यात बीएमसी मुंबईचे टेलिफोन ऑपरेटर मनोहर सुतार व महापालिकेचे लिपिक सतीश वाघमारे यांना आदर्श दृष्टिबाधित कर्मचारी पुरस्कार देण्यात आला. अकलूज येथील लोकमतचे जेष्ठ पत्रकार राजीव लोहकरे व सोलापूर सिंहासनचे संपादक प्रशांत कटारे यांना आदर्श पत्रकार पुरस्काराने गौरविण्यात आले. शाल, सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.
या कार्यक्रमात नेत्ररोग तज्ञ डॉक्टर वाळवेकर यांनी नेत्रदानाबाबत माहिती, समज, गैरसमज व आवाहन याविषयी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले.

प्रारंभी सचिव महामुनी यांनी स्वागत केले तर उपाध्यक्ष शरद पोतदार यांनी प्रास्ताविकात आराधना संस्थेची माहिती दिली. यावेळी मनोरंजनपर एन ए बी विद्यार्थ्यांच्या ऑर्केस्ट्रा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिज भानप व अनुराधा गंगूल यांनी केले. या कार्यक्रमास वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील नामवंत मंडळी उपस्थित होती. कार्यक्रमाची सांगता दृष्टी बाधित कलाकारांनी सादर केलेल्या सुश्राव्य गीतांनी झाली. तसेच यावेळी एन ए बी निवासी अंधकार्यशाळेत घेण्यात आलेल्या गायन/ वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या व सहभागी विद्यार्थ्यांना रोख बक्षीस वाटप करण्यात आले .