Home पंढरपूर चार विधानसभा आणि दोन लोकसभा मतदारसंघात ताकत असलेल्या सहकार शिरोमणी कारखान्याची...

चार विधानसभा आणि दोन लोकसभा मतदारसंघात ताकत असलेल्या सहकार शिरोमणी कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणार!

1012
0

निवडणुक बिनविरोध कल्याणराव‌ काळेंचे प्रयत्न

पंढरपूर- पंढरपूर, सांगोला, माळशिरस आणि मोहोळ विधानसभा तर सोलापूर आणि माढा लोकसभा मतदार संघात निर्णय टाकत असलेल्या सहकार शिरोमणी वसंतदादा काळे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी चेअरमन कल्याणराव काळे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र सध्या नव्यानेच प्रतिस्पर्धी झालेले विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्याकडून कसा प्रतिसाद मिळतो यावर पुढील समीकरण अवलंबून असणार आहे.

सध्या विठ्ठल परिवाराच्या ताब्यात असलेली यशवंतराव चव्हाण नागरी सहकारी पतसंस्था, निशिगंधा सहकारी बॅंक या सहकारी संस्थांच्या निवडणुका बिनविरोध करण्यात विठ्ठल परिवाराचे ज्येष्ठ नेते कल्याणराव काळे यांना यश आले आहे. या यशा नंतर सहकार शिरोमणी वसंतराव काळे यांनी सहकारी साखर कारखान्याची निवडणुक बिनविरोध होण्यासाठी विठ्ठल परिवाराचे ज्येष्ठ नेते कल्याणराव काळे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. कल्याणराव काळे यांचे मुख्य मदार राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर आहे. शरद पवारांनी हिरवा कंदील दाखवल्यास निवडणूक बिनविरोध होऊ शकते असं मतं जाणकार व्यक्त करीत आहेत.

कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या तालुक्यातील अनेक सहकारी संस्थांच्या निवडणुक प्रक्रियेला पुन्हा सुरवात झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे यांच्या ताब्यात असलेली यशवंतराव चव्हाण नागरी सहकारी पतसंस्था व निशिगंधा सहकारी बॅंक या दोन प्रमुख संस्थांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. या निवडणुकांच्या माध्यमातून त्यांनी तालुक्यातील सर्व भागातील कार्यकर्त्यांना समान न्याय देवून त्यांनी राजकीय व सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. दोन संस्थांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या नंतर आता सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

(कै.) वसंतराव काळे यांनी या कारखान्याची उभारणी केली. अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर 1995 साली प्रत्यक्षात कारखाना सुरु झाला. कारखाना सुरु झाल्यानंतर गेल्या 28 वर्षामध्ये अपवाद वगळता बहुतांश वेळा कारखान्याची निवडणुक बिनविरोध झाली आहे. गत पंचवार्षिक निवडणुकीमध्ये डाॅ.बी.पी.रोंगे व कारखान्याचे माजी संचालक दीपक पवार यांनी कारखान्याची निवडणुक लावली होती. यामध्ये त्यांच्या हाती फारसे काही लागले नाही.तरीही दिपक पवार यांनी काळे यांच्या विरोधातील भूमिका कायम ठेवत लढा सुरुच ठेवला आहे.

सध्या कारखान्याच्या निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. येत्या काही दिवसामध्ये कारखान्याची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी मोर्चे बांधणी सुरु केली आहे. यावर्षी त्यांनी सभासदांना चांगला ऊस दर जाहीर केल्यामुळे सभासदांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. वेळेत सर्व सभासदांच्या उसाचे गाळप करण्यात ही कारखाना प्रशासनाला यश आले आहे. तर दुसरीकडे काळे यांच्या विरोधातील दीपक पवार यांच्या मागे फारशी राजकीय ताकद नसल्याने त्यांचा विरोधाला मर्यादा आल्या आहेत.

कल्याणराव काळे यांचे माढा लोकसभा मतदार संघासह माढा, पंढरपूर, सांगोला,मोहोळ या चार विधानसभा मतदार संघात मोठी राजकीय ताकद आहे . त्यामुळे सर्वच पक्षातील नेते कल्याणराव काळे यांच्या कायम संपर्कात असतात. त्यामुळे कारखान्याच्या निवडणुकीत त्यांच्या विरोधात कोणी मोठा नेता जाईल अशी सध्याची तरी परिस्थिती नाही. त्यामुळे कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी ही भूमिका त्यांच्या विरोधकांची देखील असल्याची खासगीत चर्चा सुरु आहे. श्री. काळे हे संयमी व शांत स्वभावाचे आहेत. त्यामुळे त्यांना निवडणुकीत अनेक राजकीय नेत्यांची मदत देखील होण्याची शक्यता आहे. कारखान्याच्या बहुतांश सभासदांनी देखील कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी अशीच भूमिका घेतली आहे.

अभिजीत पाटील यांच्या भूमिकीकडे लक्ष

विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील सहकार शिरोमणीच्या निवडणुकीत कोणती भूमिका घेणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही. त्यामुळे त्यांच्या भूमिकीकडे लक्ष लागले आहे. पाटील यांनी विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीत ऐतिहासीक विजय मिळवल्यानंतर त्यांची तालुक्याच्या राजकारणातील महत्व ही वाढले आहे.
राजकीय महत्वाकांक्षा बाळगून असलेले अभिजीत पाटील यांनी सध्या मिशन विधानसभा सुरू केले आहे.

मात्र पंढरपूर तालुक्यातील सहकार चळवळीचा इतिहास बघता परिचारक, भालके, काळे गटाने कधीही एकमेकांच्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये लक्ष घातलं नाही. संस्था टिकली पाहिजे वाढली पाहिजे यातून शेतकरी सभासदांचे भले होणार आहे. हाच दृष्टीकोन स्वर्गीय औदुंबर अण्णा पाटील, स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक, स्वर्गीय भारत नाना भालके, स्वर्गीय वसंतदादा काळे स्वर्गीय यशवंत भाऊ पाटील, स्वर्गीय राजू बापू पाटील यांनी ठेवला होता.
केवळ विरोधाला विरोध करुन परिवारातील नेत्यांची व सभासदांची नाराजी ओढवून घेण्यापेक्षा निवडणूकी पासून दूर राहून बेरजेचे राजकारण केले तर ते भविष्याच फायद्याचे ठरु शकते असेही अभिजीत पाटील यांच्या थिंक टॅंकमधील काही जणांचे मत आहे.