Home क्राईम उकाड्याने त्रस्त कुटुंबाला गच्चीवर झोपले पडले महागात ; 27 तोळे दागिन्यासह 13...

उकाड्याने त्रस्त कुटुंबाला गच्चीवर झोपले पडले महागात ; 27 तोळे दागिन्यासह 13 लाखांची झाली घरफोडी

222
0

पंढरपूर :- प्रचंड उकाड्यामुळे रात्री घराच्या गच्चीवर झोपायला गेलेल्या कुटुंबीयांचे घर फोडून चोरट्यांनी २७ तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम मिळून एकूण १३ लाख रूपयांचा ऐवज लांबविल्याची घटना माढा तालुक्यातील चिंचगाव येथे घडली आहे.

फिर्यादी प्रवीण भानुदास साठे यांनी कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द फिर्याद नोंदविली आहे. सध्या उन्हाळ्यात प्रचंड उकाडा जाणवत असून रात्रीही उष्णतेच्या झळा असह्य होतात. त्यामुळे ग्रामीण भागात घराला गच्ची किंवा समोर मोकळे अंगण असलेले कुटुंबीय रात्री घरात झोपण्याऐवजी गच्चीवर वा मोकळ्या अंगणात झोपतात.

कुर्डूवाडीजवळच्या चिंचगावात प्रवीण साठे यांचे कुटुंबीय रात्री घराला बाहेरून कुलूप लावून गच्चीवर झोपण्यासाठी गेले होते. साठे यांनी पहाटे लवकर कामानिमित्त घराबाहेर पडायचे असल्यामुळे पहाटे पावणेतीन वाजता त्यांना जाग आली. ते गच्चीवरून खाली असता घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी लगेचच कुटुंबीयांना झोपेतून उठविले आणि घरात जाऊन पाहिले असता लोखंडी कपाट चोरट्यांनी फोडून त्यातील २७ तोळे सोन्याचे दागिने आणि दहा हजार रूपयांची रोकड असा ऐवज चोरून नेल्याचे आढळून आले.

प्रवीण साठे यांच्या आजी वेणूबाई उबाळे मयत झाल्याने त्यांचे दागिने अनंता उबाळे यांनी साठे यांच्याकडे आणून ठेवले होते. हे दागिनेही चोरट्यांनी लांबविले आहेत.