Home पंढरपूर भिमाच्या विजयाने विठ्ठल, चंद्रभागा परिवाराला मिळाली नवसंजीवनी ; तर प्रशांत परिचारकांवरील “हा”...

भिमाच्या विजयाने विठ्ठल, चंद्रभागा परिवाराला मिळाली नवसंजीवनी ; तर प्रशांत परिचारकांवरील “हा” आरोप झाला अधिकच गडद.

1214
0

पंढरपूर :- स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांच्या निधनानंतर विठ्ठल परिवारात नेतृत्वाची एक पोकळी निर्माण झाली होती. विठ्ठल आणि चंद्रभागा सहकारी साखर कारखाना आर्थिक अडचणीत सापडला होता. आमदार भालकेंच्या निधनानंतर विठ्ठल कारखान्याची जबाबदारी भगीरथ भालके यांच्यावर आली. मात्र कारखाना सुरू करण्यामध्ये त्यांना अपयश आले होते. तर दुसरीकडे सहकार शिरोमणी वसंतदादा काळे सहकारी साखर कारखान्याची परिस्थिती देखील वेगळी नव्हती. चेअरमन कल्याणराव काळे यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. याच दरम्यान झालेल्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भगीरथ भालके यांचा निसटता पराभव झाला. तसेच विठ्ठल सहकारी मध्ये देखील भगीरथ भालके यांना पराभव स्वीकारावा लागला. राज्यात सत्ता असताना देखील उमेदवार पराभूत झाल्याने विठ्ठल परिवार, भीमा परिवार आणि चंद्रभागा परिवारामध्ये नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली होती. मात्र भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विद्यमान चेअरमन तथा खासदार धनंजय महाडिक यांनी माजी आमदार प्रशांत परिचारक आणि माजी आमदार राजन पाटील यांचा पराभव केला. या निवडणुकीत महाडिकांनी आमदार समाधान दादा आवताडे, विठ्ठलचे चेअरमन अभिजीत आबा पाटील, माजी चेअरमन भगीरथ दादा भालके, सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे, मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्यासह प्रमुख परिचारक विरोधी गटाची मोट बांधली. आणि विजयश्री खेचून आणली. भिमाच्या विजयाने विठ्ठल परिवार चंद्रभागा परिवार आणि भीमा परिवाराला नवसंजीवनी मिळाली आहे. मरगळ आलेल्या परिचारक विरोधकांना 100 हत्तीचं बळ आलं आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भीमा सहकारी साखर कारखान्याचे निवडणूक लक्ष घातले होते. त्यांनी माजी आमदार प्रशांत परिचारक यांना निवडणुक न लढण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र पक्षनेत्याचा आदेश डावलत परिचारक निवडणूक रिंगणात उतरण्याचा आरोप खासदार धनंजय महाडिक यांनी केल्याने भाजप पुरस्कृत म्हणून जिल्ह्यात राजकारण करणाऱ्या परिचारकांना मोठा धक्का बसलाय.
आमदार समाधान आवताडे यांनी मात्र पक्ष नेत्यांचा आदेश मानून महाडीकांसोबत राहणंच पसंत केलं.

बिनविरोध होणारी निवडणूक फक्त परिचारक आणि पाटील यांच्या राक्षसी प्रवृत्तीमुळेच निवडणूक झाली. असा वारंवार आरोप खासदार धनंजय महाडिक यांनी केला होता. त्यामुळे आता महाडिक यांनी देखील यापुढे जिथे जिथे परिचारक निवडणूक रिंगणात असतील त्या निवडणुकीत महाडिक कुटुंब पूर्ण ताकतीनिशी उतरेल असा इशारा प्रशांत परिचारक यांना दिला. स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांच्या निधनानंतर विखुरलेल्या विठ्ठल, चंद्रभागा परिवाराला खासदार महाडिक यांच्यामुळे एक खमकं आणि जाणतं नेतृत्व मिळालं आहे.
आज नूतन संचालकांच्या सत्कार कार्यक्रमांमध्ये मध्ये देखील खासदार महाडिक यांनी पुन्हा एकदा परिचारकांवर निशाणा साधलाय. यावेळी उपस्थित असणारे विठ्ठलचे चेअरमन अभिजीत आबा पाटील, सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे, विठ्ठलचे माजी चेअरमन भगीरथ दादा भालके, मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांची भक्कम मोट बांधून परिचारकांच्या विरोधात लढण्याचे मनसुबे खासदार महाडिक यांनी मोठ्या आक्रमकपणे बोलून दाखवले. खासदार महाडिक यांनी स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांच्यासारखाच आक्रमकपणा परिचारकांच्या विरोधात दाखवल्याने भालके, काळे आणि महाडिक समर्थकांमध्ये जोश आला आहे.

——————————————–
ताज्या झाल्या 2011 च्या पंढरपूर नगरपालिका निवडणुकीच्या आठवणी

2011 साली झालेल्या पंढरपूर नगरपालिका निवडणुकीमध्ये आमदार भारत भालके आजारी पडल्याने रुग्णालयात उपचार घेत होते. त्यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी प्रचाराची सूत्रे हाती घेत विजयश्री खेचून आणली होती. आता देखील पंढरपूर नगरपालिका निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते. मात्र परिचारक विरोधकांमध्ये एक मरगळ आली होती. खासदार महाडिकांनी माजी आमदार प्रशांत परिचारक यांना दिलेल्या थेट आव्हानामुळे परिचारक विरोधक पुन्हा जोमाने कामाला लागल्याचे दिसत आहे.

——————————————–

माजी आमदार प्रशांत परिचारकांवर मराठा नेतृत्वाला टार्गेट करत असल्याचा पुन्हा होतोय आरोप

परिचारक हे पांडुरंग परिवाराच्या माध्यमातून गेली 30 ते 35 वर्ष झालं पंढरपूरच्या राजकारणामध्ये सक्रिय आहेत. माजी आमदार स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांनी 25 वर्ष पंढरपूरचे नेतृत्व केले. या काळात कधीही त्यांच्यावर मराठा नेतृत्वाला लक्ष करीत असल्याचा आरोप झाला नाही. मात्र माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी पांडुरंग परिवाराची धुरा हाती घेतल्यानंतर त्यांच्यावर सातत्याने मराठा नेतृत्वाला लक्ष करीत असल्याचा आरोप होताना दिसत आहे. स्वर्गीय आमदार भारत नाना भालके, स्वर्गीय राजाभाऊ पाटील, कल्याणराव काळे, स्वर्गीय राजूबापू पाटील यांच्यापासुन ते आमदार समाधान दादा अवताडे यांच्या विरोधात दामाजी कारखाना निवडणुकीमध्ये विरोध, भगीरथ भालके यांना विरोध, विठ्ठलचे चेअरमन अभिजीत पाटील यांना विरोध ही मालिका सुरूच आहे. भीमा सहकारी साखर कारखान्याच्या शेवटच्या सभेत विठ्ठलचे चेअरमन अभिजीत पाटील माजी आमदार प्रशांत परिचारकांवर थेट आरोप केला होता. ज्यांना बहुजनांची पोरं चालत नाहीत, त्यांच्याविरुद्ध बहुजन समाज एकत्र आलाय असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यामुळे माजी आमदार प्रशांत परिचारकांवरील मराठा नेतृत्वाला लक्ष करीत असल्याचा आरोप अधिकच गडद होत आहे.