Home पंढरपूर युवक नेते भगीरथ भालकेंच्या “त्या” वक्तव्याचे पंढरपुरात पडसाद राष्ट्रवादीसह भालके गटाला...

युवक नेते भगीरथ भालकेंच्या “त्या” वक्तव्याचे पंढरपुरात पडसाद राष्ट्रवादीसह भालके गटाला लागली घरघर

721
0

पंढरपूर :- स्वर्गीय भारत नाना भालके यांनी सलग तीन वेळा पंढरपूरचे प्रतिनिधित्व केले. 22 वर्ष त्यांनी विठ्ठल परिवार एक संघ ठेवला. मात्र त्यांच्या निधनानंतर विठ्ठल परिवाराला घरघर लागली आहे. यामध्येच राष्ट्रवादीचे नेते भगीरथ दादा भालके यांनी मंगळवेढा तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका परिचारकांसोबत लढण्याचे जाहीर केले. त्या वक्तव्याचे पडसाद आता पंढरपुरच्या राजकारणात उमटण्यात सुरुवात झाली आहे. स्वर्गीय भारत नाना भालके यांचे कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयसिंह देशमुख यांनी भाजप आमदार समाधान आवताडे यांच्या सोबत काम करण्याचा निर्णय घेतलाय. भगीरथ भालके यांच्या त्या वक्तव्यावरून विठ्ठल परिवार अस्वस्थ असल्याचे दिसून येत आहे.

स्वर्गीय भारत नाना यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचे सुपुत्र भगीरथ दादा यांचा निसटता पराभव झाला. भाजपने परिचारक अवताडे गटांना एकत्र आणत विजयश्री खेचून आणली. त्यानंतर मात्र परिचारक आणि अवताडे यांच्यातील वाद वाढत गेला. मंगळवेढ्याच्या संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत परिचारक आणि भालके गट एकत्र येत समविचारी आघाडी स्थापन केली. या निवडणुकीत आमदार समाधान आवताडे यांच्या सह त्यांच्या पॅनलचा धुवा उडाला. दामाजी कारखान्यात मिळालेल्या विजयामुळे समविचारी आघाडीचे मनोबल वाढले. काही दिवसांपूर्वी झालेल्या मंगळवेढ्यातील एका कार्यक्रमात आमदार प्रशांत परिचारक आणि युवक नेते भगीरथ भालके एकत्र आले होते. मंगळवेढा तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समविचारी आघाडी एकत्र लढणार असल्याचे भालके यांनी जाहीर केले. तसेच परिचारक बालके एकत्र आल्याने काहींच्या पोटात पोटशुळ उठला आहे असे विधान त्यांनी केले. त्यानंतर मात्र पंढरपूर – मंगळवेढा मतदार संघात एकच खळबळ उडाली.

पोटनिवडणुकीत पराभव, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पराभव झाल्याने भगीरथ भालके हे कार्यकर्त्यांच्या संपर्कात नव्हते. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता होती. राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे, मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी विठ्ठल परिवार सक्रिय ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र भालके हे जास्त सक्रिय झालेले दिसले नाहीत. त्या उलट विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी कारखान्याचा अध्यक्ष या नात्याने विठ्ठल परिवाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. त्यामुळे भगीरथ भालके यांनी आपला मोर्चा मंगळवेढ्याकडे वळवला. दामाजी कारखान्याच्या निवडणुकीच्या माध्यमातून परिचारक – भालके गट एकत्र आला आणि त्यांनी सत्ता काबीज केली. हीच आघाडी पुढे चालू ठेवण्याचा निर्णय भालके यांनी जाहीर केला. आणि याच निर्णयाने घात झाला. विठ्ठल परिवार हाच परिचारकांना तोड देऊ शकतो हे या मतदारसंघाचे राजकीय समीकरण आहे. मात्र परिवाराच्या नेत्यानेच परिचारकांबरोबर आघाडी केल्याने विठ्ठल परिवारामध्ये अस्वस्थता पसरली आहे. आजी-माजी नगरसेवकांसह,राष्ट्रवादीचे पदाधिकारी, भालके समर्थक, परिचारक विरोधकांनी नवा पर्याय शोधण्याचे काम सुरू केले. संजय बंदपट्टे यासारख्या नेत्यांनी तर थेट शिंदे गटात प्रवेश केला. तर काही पदाधिकारी आमदार समाधान आवताडे आणि विठ्ठलचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या संपर्कात गेले.
अवताडे – परिचारकांमध्ये सुप्त संघर्ष सुरू आहे. दामाजीची सत्ता हिरावून घेतल्याने अवताडे देखील परिचारकांवर नाराज आहेत. त्यामुळे त्यांनी आता पंढरपूर तालुक्यात स्वतंत्र मोर्चे बांधणी सुरू केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी,भालके गट,विठ्ठल परिवारातील अनेक नेते त्यांनी आपलेसे केले आहेत. तर विठ्ठल च्या निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात परिचारकांच्या विरोधात शड्डू ठोकल्याने अभिजीत आबा पाटील देखील विठ्ठल परिवाराचे लाडके झाले होते. त्यामुळे त्यांच्याकडे देखील भालके गटाचा कल वाढला आहे. भविष्यात परिचारक – भालके विरुद्ध पाटील – अवताडे गट एकत्र येण्याची शक्यता आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे आणि मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी मात्र सावध भूमिका घेतली आहे.
एकंदरीतच भगीरथ भालके यांच्या एका वक्तव्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि विठ्ठल परिवाराला अखेरची घरघर लागल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आणि कट्टर भालके समर्थक विजयसिंह देशमुख यांनी त्याची प्रचिती दाखवून दिली आहे. आता हे डॅमेज कंट्रोल भगीरथ भालके कसे हाताळतात यावर त्यांची राजकीय मुत्सद्यगिरी स्पष्ट होणार आहे.